28 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या केली

शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (10:07 IST)
गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन सालेकसा येथे 28 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने (ज्योती बघेले)राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  
 
ज्योती बघेले आणि त्यांचे पती रमेश गिरिया हे दोघेही सालेकसा येथे पोलीस विभागात कार्यरत आहेत. ज्योती सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये, तर रमेश सी 60 पथकात कार्यरत आहेत. सकाळी दोघेही आपापल्या ड्युटीवर गेले होते. ज्योती बघेले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुन्हा आपल्या घरी आल्या. काही वेळानंतर त्यांनी गळफास लावून आयुष्याची अखेर केल्याचे दिसून आले.
 
याविषयी सालेकसा पोलिसांना माहिती मिळताच बघेले यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची गंभीर परिस्थिती पाहता त्यांना गोंदिया येथे रेफर केले. गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
उच्चस्तरीय तपासणीसाठी ज्योती बघेले यांचा मृतदेह गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. ज्योती यांनी आत्महत्या का केली? हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. सालेकसा पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती