राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे राज्य शासनाच्या महासंस्कृती आणि पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, चित्रपटांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई फिल्मसिटी येथे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त इतर ठिकाणी चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे. पुण्यात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक वातावरण आणि कुशल मनुष्यबळ लक्षात घेता अशा ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. पुणे चित्रपट महोत्सवात त्यासाठी आवश्यक चांगल्या कल्पना पुढे येतील.
गेल्या दोन दशकापासून हे आयोजन होत आहे. कोरोनाचे संकट असतानाही महोत्सवाचे चांगले आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने चित्रपटांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. मुंबई चित्रपटांची राजधानी आहे आणि पुण्यात चित्रपटांसाठी अनुकूल वातावरण आहे. चित्रपट महोत्सवाच्यानिमित्ताने जगातील चित्रपट सृष्टिशी निगडित व्यक्ती एकत्र घेतात, कल्पनांची देवाणघेवाण करतात. हा महोत्सव भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात आयोजित व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी देशमुख यांच्या हस्ते चित्रपट महोत्सवातील विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठीचा पुरस्कार पोरगं मजेत आहे या चित्रपटाला आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी प्रभात पुरस्कार शुड द विंड ड्रॉप या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.