आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ‘त्या’ सावकारास अटक

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (08:30 IST)
दहा हजार रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावून नाशिकमध्ये सातपूरच्या भाजी विक्रेत्या युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिंपळगाव बहुला येथील निखील भावले या संशयित सावकारास पोलिसांनी अटक केली.
 
सातपूर परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा नीलेश बाळासाहेब सोनवणे (३०) हा आपल्या आई-वडील लहान भावासोबत अशोकनगर परिसरात राहत होता. त्याने पिंपळगाव बहुला येथील नीलेश भावले या सावकाराकडून बाजारमुल्यापेक्षा अती वाढीव दराने १०००० रुपयांचे कर्ज घेतले होते.
 
ही रक्कम वसुल करण्यासाठी सावकाराने त्याची दुचाकी देखील ओढून नेली होती. या सर्व कारणांमुळे नीलेश नैराश्यात होता. त्यातूनच त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत नीलेशने दरमहा २५ टक्के दराने सावकराकडून रक्कम उचलल्याची चर्चा आहे. आत्महत्येच्या प्रकारानंतर सावकार फरार झाला होता. मयत नीलेश सोनवणे याच्या कुटुंबीयांनी सावकारविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. बुधवारी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष घोटेकर यांनी संशयित भावले यास अटक केली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती