नाशिकच्या कळवण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाने प्रसूतीगृहाने राष्ट्रीय परिक्षणात ९० टक्के मिळवत राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. गेल्या आठवड्यात भारत सरकारच्या मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांच्या सहीचे पत्र येथील प्रशासनास प्राप्त झाले आहे. यामुळे कळवण उपजिल्हा रुग्णालय कायमच रुग्णाभिमुख सेवा देत असून या मानांकनाने रुग्णांना सर्वोत्कृष्ट सेवा देत असल्याचे सिद्ध झाले आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयामार्फत आरोग्य संस्थांद्वारे प्रसूतीसेवा दिल्या जाणाऱ्या प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया विभागाचे परीक्षण केले जाते.
यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील उपजिल्हा रुग्णालयांचे परीक्षण नवी दिल्लीच्या डॉ. अनिता कन्सल व लखनऊ येथील डॉ. सीमा निगर यांनी केले होते. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना प्रसूतीविषयक सेवा गुणवत्तापूर्ण सेवा कशाप्रकारे पुरविल्या जातात यासाठी मूल्यांकन केले. मूल्यांकनावेळी प्रसूत मातांचे अधिकार, सेवा कक्षात रुग्णालयामार्फतच संसर्ग प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना, स्वच्छता सेवा, गुणवत्ता व्यवस्थापन, गुणवत्ता व सेवेच्या दर्जात झालेली गुणात्मक वाढ व प्रसूत महिला व सोबत असलेल्या नातेवाइकांचे सेवेबद्दलचे अभिप्राय या निकषांची तपासणी केली होती.
दरम्यान, राज्यभरातून सर्व आरोग्य संस्थांमधून उपजिल्हा रुग्णालयाने ९० टक्के गुण मिळवत प्रसूती कक्ष श्रेणीत मानांकनासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. यापूर्वी शस्त्रक्रिया गृहाला ९२ टक्के सहित प्रथम मानांकन मिळाले आहे. तसेच रुग्णालयाने कायाकल्प पुरस्कार मिळवत दुसरा क्रमांक यापूर्वी पटकावला आहे.