नाशिक क्रिकेटसाठी अत्यंत अभिमानाची बातमी, ‘या’ क्रिकेटपटूची निवड

सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (22:24 IST)
नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची याही वर्षी प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे.  माया सोनवणे ही उत्तम फिरकीपटू असून ऑक्टोबर अखेर डेहराडून येथे झालेल्या महिला एकदिवसीय  सामन्यांच्या स्पर्धेत मायाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्या स्पर्धेत मायाने ५ सामन्यात २१ षटकांत केवळ ३.३३ च्या सरसरीने ७० धावा देऊन ४ गडी बाद केले. चार षटकांत १२ धावांत ३ बळी अशी तिची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी होती.
 
२०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बात करण्याचा पराक्रम केला होता. पुदुचेरी येथे झालेल्या २३ वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत २०१८-१९ मध्ये  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती. ह्या सगळ्या लक्षणीय, सातत्यपूर्ण कामगिरी च्या जोरावर मायाची मागील हंगामा प्रमाणे यंदाही प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली आहे.
 
मुळची सिन्नरची असलेली माया सोनवणे , सिन्नरचे सुनील कानडी ह्यांच्यामुळे क्रिकेट कडे वळली . अगदी सुरुवातीपासूनच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर ह्यांचे बहुमोल  मार्गदर्शन लाभले . तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव, सिन्नर ह्यांचे ही  वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 
 
वयाच्या केवळ ११ व्या वर्षी च मायाची महाराष्ट्र संघासाठी निवड झाली होती. दुखापतीमुळे दुर्दैवाने मायाचे दोन हंगाम वाया गेले. एक अतिशय भरवशाची अष्टपैलु खेळाडु होण्याचे तिचे स्वप्न आहे. योगायोगाने पुर्वी कधीही न बघितलेल्या द. आफ्रिकेच्या कंबरेत अतिशय वाकुन खास शैलीत गोलंदाजी करणार्‍या पॉल अॅडम्स प्रमाणेच माया उजव्या हाताने सुरेख लेग स्पिन टाकते. आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडु स्नेह राणा ह्या इंडिया ए संघाची कर्णधार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे सदर चॅलेंजर ट्रॉफीसाठी ची स्पर्धा  विजयवाडा येथे ४ ते ९ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती