नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी महाराष्ट्र - गोवा सीमेवर ट्राफिक जाम

मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (15:17 IST)
नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढली असून त्यांनी आणलेल्या वाहनांनी राज्यात सर्वत्र ‘ट्राफिक जाम’ केले आहे. कुठ्ठाळीत झुआरी पुलानजिक ट्राफिक पूर्णतः कोलमडले. पणजीत सर्वत्र ट्राफिक व्यवस्था अडचणीत आली. म्हापसा – पणजी महामार्गावर ट्राफिक पूर्णतः ठप्प झाले तर अटलसेतूच्या फोंडा बाजूने एक मार्ग बंद झाल्याने मेरशी ते पणजीपर्यंत वाहतुकीत ‘चक्का जाम’ झाल्यासारखी अवस्था झाली. परिणामी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी राष्ट्रीय महामार्गावरील बाणास्तारी पूल ते पणजी दरम्यान अतिअवघड आणि बहुचाकवाल्या मोठय़ा ट्रकांवर येत्या दि. 5 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.
 
जीवाचा गोवा करायला मोठय़ा प्रमाणात आलेल्या पर्यटकांनी राज्यातील हॉटेले फुल्ल झालेली आहेत. त्याचबरोबर राज्यातील खानावळी देखील पर्यटकांनी भरुन गेलेल्या आहेत. त्यातच पर्यटकांनी आणलेल्या वाहनांमुळे राज्यातील बहुतांश शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील पोलिसांचे नियंत्रण गेले आहे. सोमवारी याचा प्रत्यय सर्वांनाच आला.
 
पोलीस मात्र दंड वसुलीत गर्क
पणजी शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी रस्ते वाहतुकीस बंद केल्याने 18 जून रस्त्यावरील वाहतुकीवर प्रचंड ताण वाढला आहे. यामुळे शहरात सर्वत्र वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. कुठेही वाहतूक पोलीस पर्यटकांना मदत करण्यासाठी उभे नव्हते, मात्र पाटो प्लाझा येथील पार्किंग प्रकल्पाच्या बाजूला एकाचवेळी 20 ते 25 वाहतूक पोलीस कर्मचारी केवळ वाहतुकीचे नियम तोडणाऱयांविरुद्ध कारवाईसाठी उभे असलेले चित्र दिसले.
 
मेरशी जंक्शनपासून सुरु होते कोंडी
अटलसेतूच्या फोंडा बाजूने सुरु झालेल्या मार्गावरील प्रत्यक्ष पुलावरील डांबरी रस्ता काढून त्या जागी नव्याने डांबरीकरण करण्यासाठीचे काम हाती घेतल्याने सर्व वाहनेही आता पणजी बसस्थानकापर्यंत येऊन ती म्हापसाच्या दिशेने मांडवी पुलावरुन वळतात. त्याचा गंभीर परिणाम वाहतुकीवर झाला व मांडवी पुलाखाली त्याचबरोबर मेरशी येथे वाहतूक सिग्नलच्या दरम्यान वाहतूक रोखली जात असल्याने वाहनांच्या मोठ मोठय़ाल्या रांगा लागलेल्या दिसतात. यामध्ये जास्तीत जास्त वाहने ही कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्रातील आहेत.
 
बाणास्तारी पूल ते पणजी दरम्यान अवजड वाहनांना बंदी
उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हागे यांनी येत्या दि. 5 जानेवारी पर्यंत बाणास्तारी पूल ते पणजी दरम्यानच्या महामार्गावरील अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घातली आहे. या संदर्भातील आदेश सायंकाळी उशिरा जारी केला. पर्यटकांची हजारोंच्या संख्येने गोव्यात वाहने आलेली आहेत. त्यातून राज्यात सर्वत्र ट्राफिक जाम झालेले दृष्टीस पडले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती