राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना ऊर्जा कंपनीकडून लवकरच स्मार्ट मीटर मिळणार आहे.मोबाईल सीमकार्डप्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड आणि प्रीपेडमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे ग्राहकांना जेवढा वीज वापर असेल तेवढे बिल अदा करावे लागेल.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबई महानगर परिसर,नागपूर,पुणे,औरंगाबाद यासारख्या शहरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश दिले. घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही राऊत यांनी दिल्या.
डॉ.आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्याचा विचार अनुसूचित जाती आणि जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीज जोडणी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशही नितीन राऊत यांनी या बैठकीत दिले.गरजूंना नाममात्र अनामत रक्कम जमा करून वीज जोडणी देणारी ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक करायला हवी. यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करण्याची सूचनाही राऊत यांनी दिली.