नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात पूर्णपणे दाखल झाले आहेत आणि शनिवारीही राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि कोकण जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे राज्यातील इतर भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत मुंबई , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये204 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. या भागात अचानक पूर, भूस्खलन आणि नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याचा धोका आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे.
शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. माटुंगा, सायन, धारावी, कुर्ला आणि चेंबूर सारख्या भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. उपनगरीय लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाला आहे. महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्णपणे सक्रिय केला आहे आणि स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
बीएमसीने समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घातली आहे. भरतीच्या वेळी समुद्रात उंच लाटा उसळू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. किनारी भागात जीवरक्षक पथके आणि पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत.
हवामान खात्याने ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.