अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत काही हॉटेलमध्ये आढळले मुदतबाह्य अन्न पदार्थ

मंगळवार, 18 जुलै 2023 (20:52 IST)
नाशिक  :- पावसाळ्यात अनेक हॉटेल्स व पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असतात. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शहरातील काही प्रतिष्ठित हॉटेलची तपासणी केली.
 
याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी बैठकीत दिलेल्या आदेशानुसार पावसाळयाच्या दिवसात पर्यटनठिकाणी तसेच शहरातील हॉटेलांमध्ये होणारी गर्दी विचारात घेवून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल तपासणीची विशेष मोहिम सुरु केली आहे.
 
या मोहिमेअंतर्गत प्रशासनातर्फे हॉटेल तपासणी मोहिमे मध्ये हॉटेल व्हेज अॅरोमा, गंगापूर रोड, हॉटेल उडपी तडका, सोमेश्वर मंदीरासमोर, हॉटेल सयाजी, इंदिरानगर, हॉटेल सियोना रेस्टॉरेंट, गंगाव्हरे गाव, हॉटेल आरटीसन स्पिरिट प्रा.लि., गंगाव्हरे गाव ता.जि.नाशिक यासह इतर 3 हॉटेल अशा एकूण ८ हॉटेलची तपासणी केली.
 
तपासणीअंती बऱ्याच हॉटेल मध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे परिशिष्ट ४ चे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. त्यात प्रामुख्याने शितपेटीत मुदतबाह्य अन्न पदार्थ साठवल्याचे आढळले आहे. तसेच मासांहारी (चिकण) व दुग्धजन्य पदार्थ हे मुदतबाह्य झाले असून देखील साठवलेले आढळले.
 
तसेच स्वयंपाकगृहात अंत्यत अस्वच्छता आढळून आली. खाद्यपदार्थ हाताळणारे व्यक्तीची वैद्यकिय तपासणी केलेली नाही व डोक्याला टोपी, हातमोजे व अॅपरोन्स दिलेले नाहित, अन्न तयार करण्यासाठी व साठवणूकीसाठी वापरण्यात आलेली भांडी अंत्यत अस्वच्छ आढळून आली. स्वयंपाकगृहात योग्य प्रकारे सुर्यप्रकाश तसेच योग्य रंग दिलेला नसल्याचे आढळून आले.
 
अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा विश्लेषन अहवाल ठेवलेला नाही, अशा प्रकारे त्रुटी आढळून आल्याने सदर हॉटेल्सला सुधारना नोटीस बजावण्यात आलेल्या असून पुढील योग्य ती कारवाई कायद्यानुसार घेण्यात येईल व ही मोहिम अशीच शुरु राहील, असे कळविण्यात आले.
 
पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना दर्जेदार अन्न पदार्थ हे उपलब्ध होण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती