चाळीसगाव : मनुष्याचे विचार आणि व्यवहार चांगले असतील तर त्याला ध्येय प्राप्तीपासून कोणी रोखू शकत नाही. तसेच सनातन धर्माच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवसाच्या वाणीतून खा. उन्मेष पाटील, संपदा पाटील आयोजित शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेल्या लाखो शिवभक्तांसमोर बोलतांना सांगितले.
मानवाने जमा केलेल्या संपत्तीचा वापर धर्म कार्यासाठी केला तर त्या मनुष्याचे धन आणि धर्म दोघांची वाढ होते. त्यामुळे मानवाने धर्म कार्यासाठी आपल्या संपत्तीचा उपयोग केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
खा.उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून दोन लाख दिव्यांनी रंगवित प्रभू श्रीरामाचे चित्र आणि अयोध्या मंदिराचे चित्र साकारण्यात आले आहे. त्याचे कौतुकही पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले. हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी आपल्या शरीराला हिंदू बनविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवपुराण कथा ऐकण्यासाठी महिला आणि पुरूष भाविक लाखोच्या संख्येने आले होते. मुलाचे पालनपोषण करणे पालकांसाठी साधना आहे. आई-वडिलांची सेवा ही मुलांसाठी आराधना असली पाहिजे. साधना आणि आराधना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.