अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आहे. मात्र, येत्या काळात धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा ठाम दावा करतानाच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, “आम्हाला निवडणूक चिन्हाबाबत कुणाला काहीच सांगण्याची गरज नाही. मेरिटच्या जोरावर ते आम्हालाच मिळेल. अंधेरीची पोटनिवडणूक लागली म्हणून निवडणूक आयोगाला निर्णय घेता आला नाही. पण आगामी काळात धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. याचं कारण म्हणजे ५५ पैकी ४० आमदार आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मतांची आकडेवारी ३९ लाख इतकी आहे. तसंच १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत आहेत आणि त्यांची मतांची आकडेवारी ६९ लाख इतकी आहे. म्हणजेच पक्षाला पडलेल्या एकूण मतांपैकी ७० टक्क्यांहून अधिक मतं आमच्याबाजूनं आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकशाहीत बहुमताला मान असतो. धनुष्यबाण चिन्ह यानुसार आम्हालाच दिलं जाईल आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सन्मान होईल.”