विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह सात जणांवर गुन्हा दाखल

बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (08:20 IST)
शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गट या दोन गटांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. एकमेकांच्या गटातील नेतेमंडळींवर जाहीर टीका करण्यात दोन्ही गटाचे नेते आघाडीवर असल्याचे कायमच दिसून आले आहे. पण आता या २ गटांमधील संघर्षाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. ठाकरे गटाचा  ठाण्याच्या गडकरी रंगायतन या नाट्यगृहात महाप्रबोधन यात्रेचा जाहीर मेळावा झाला.

या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मालिन केल्याचा शिंदे गटाने ठाकरे गटातील नेतेमंडळींवर केला आहे. त्यामुळेच, राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटातर्फे रविवारी महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची नक्कल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि नक्कल केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, ठाणे महिला आघाडीच्या अनिता बिर्जे, मधुकर देशमुख, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह सात जणांविरुद्ध मंगळवारी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन चव्हाण यांचाही समावेश आहे.

Edited By - Ratandeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती