अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक: एकनाथ शिंदे गटानं जागा भाजपासाठी का सोडली?
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (20:39 IST)
महाराष्ट्रात शिवसेनेतल्या बंडामुळे सगळीच राजकीय समीकरणं बिघडलेली असतांनाच आणि शिवसेना कोणाची याचा नेमका सोक्षमोक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत लागतील असाच कयास असताना राज्यात एक पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पाहायला गेलं तर ती एका विधानसभेच्या जागेची पोटनिवडणूक, पण आता तिच्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
मुंबई महापालिका निवडणूक कधी होईल हे अद्याप माहित नाही, पण बंडानंतरची ही पहिली पोटनिवडणूकच मोठ्या लढाईचं मैदान ठरणार असं चित्र आहे.
ही पोटनिवडणूक मुंबईतल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेसाठी आहे. शिवसेनेचे रमेश लटके या मतदारसंघातून विधानसभेत आमदार होते. पण याच वर्षी 12 मे रोजी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.
आता निवडणूक आयोगानं येथे पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.
3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल हाती येईल. त्यामुळे मुंबईची यंदाची दिवाळी ही निवडणुकीच्या ज्वरानं भरलेली असेल.
पण अर्थात सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीत शिवसेनेकडेच असेल जी दोन गटांमध्ये विखुरलेली आहे. पण इथे खरी मेख आहे.
मूळ युतीत शिवसेनेकडे असलेली जागा शिंदे गट, जो मूळ शिवसेना असल्याचा दावा करतो, भाजपासाठी सोडतो आहे. ही पोटनिवडणूक भाजपा लढवणार आहे. या निर्णयावरुन अर्थात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
'भाजप-शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजी पटेल'
हे जवळपास निश्चित झालं आहे की अंधेरी पूर्वची जागा भाजपा लढवणार आहे. भाजपा आणि शिंदे गटाची आता युती आहे आणि विधानसभेत ते एकत्र आहेत.
शिंदे गटाचा दावा आहे, जो सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे, की तेच खरी शिवसेना आहेत. पण असं असतांनाही ज्या जागेवर शिवसेनेचा आमदार निवडून आला होता, ती जागा युतीअंतर्गत शिंदे गटानं भाजपाला दिली आहे.
भाजपा आणि शिंदे गटानं निवडणूक जाहीर झाल्यापासून तशी अधिकृत घोषणा केली नाही, पण भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या मंगळवारच्या ट्विटनंतर हे स्पष्ट झालं.
त्यांनी भाजपाच्या मुरजी पटेल यांना युतीचा उमेदवार घोषितही केलं आणि त्यांच्या अंधेरीतल्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटनही केलं.
शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं,"अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. भाजपा आणि शिंदे गट युतीचे उमेदवार श्री मुरजीभाई पटेल यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा असल्याचे यावेळेस दिसले.
अंधेरीतून अगोदर नगरसेवक असलेली मुरजी पटेल हे 2014 पासूनच आमदारकीसाठी इच्छुक होते.
2019 मध्ये पुन्हा युती झाल्यावर मात्र अंधेरी पूर्व ही जागा शिवसेनेकडे गेली कारण इथून त्यांचेच आमदार निवडून आले होते. पण पटेलांनी बंडखोरी केली आणि युतीचे उमेदवार असणा-या शिवसेनेच्या रमेश लटकेंविरुद्ध अपक्ष निवडणूक लढवली.
लटके जवळपास 15 हजारांच्या मताधिक्क्यानं निवडून आले. पटेलांना तेव्हा 45 हजार मतं मिळाली होती. पण तेव्हा पटेलांन बंडखोरी करण्यापासून परावृत्त न करु शकलेल्या भाजपानं आता मात्र पोटनिवडणूकीत त्यांनाच तिकीट दिलं आहे.
शिवसेनेनं भाजपाचा या निर्णयावर तात्काळ टीका केली आहे. उद्धव ठाकरे कायम भाजपानं युतीधर्म पाळला नाही असा आरोप करतात, तोच या उमेदवारीनं भाजपानं सिद्ध केला आहे असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केल आहे.
"भाजपानं कधीही युतीधर्माचं पालन केलं नाही. यावर सातत्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला, पण आम्ही कसे सच्चे असा कांगावा आशिष शेलार आणि देवेंद्रजींनी वारंवार केला. 2019 मध्ये भाजपानं युतीधर्म न पाळता विधानसभेच्या निवडणुकीत 40 जागांवर शिवसेनेच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे केले. याच पद्धतीनं त्यांनी अंधेरीमध्ये मुरजी पटेल यांना रमेश लटके यांच्याविरुद्ध बंडखोरी करुन उभं केलं होतं. तेव्हा भाजपानं कांगावा केला होता की मुरजी पटेलांचा आणि आमचा काही संबंधच नाही आहे. त्यांचा तो कांगावा आता उघडा पडला आहे कारण त्याच मुरजी पटेलांना भाजपानं अधिकृत उमेदवारी या पोटनिवडणुकीत दिली आहे. त्यामुळे भाजपा युतीतही शिवसेनेला संपवण्याचाच प्रयत्न करत होती," असं अंधारे म्हणाल्या आहेत.
शिंदे गटानं जागा भाजपाला का सोडली?
पण उद्धव ठाकरेंच्या सेनेनं भाजपावर या उमेदवारीमुळे केलेली टीका एका बाजूला ठेवली तरी हा प्रश्न पडतोच की, शिंदे गटानं या जागेवरचा दावा कसा सोडला. याचे राजकीय परिणामही होणं शक्य आहे.
शिंदे आणि आमदारांनी भाजपाचा मदतीनं बंड केलं आणि भाजपाला शिवसेना संपवायची आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं केला आहे. सेनेची जागा भाजपाला देणं हे शिवसेनेसाठी या आरोपांचं उदाहरण ठरु शकतं.
शिंदे गटानं ही जागा भाजपासाठी सोडण्याची काही कारणंही सांगितली जात आहेत. एक म्हणजे शिंदे गटाकडे या जागेसाठी तगडा उमेदवार या भागात नाही आहे.
दुसरं म्हणजे शिंदे गटाकडे अद्याप चिन्हंही नाही आहे. शिवसेनेवरचा आणि त्यांच्या चिन्हावरचा दावा अद्यापही निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्याचा निर्णय कदाचित या पोटनिवडणुकीअगोदर येऊसुद्धा शकतो.
जेव्हा शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना जेव्हा या बद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की युतीमध्ये एखादी जागा बदलली जातच नाही असं होत नाही. निवडून येणं यालाच प्राध्यान्य असतं असं त्यांचं म्हणणं आहे.
"जशी बोलणी झाली असतील, जसं ठरलेलं असतं तसं होतं. जागा बदलतच नाही असं होत नाही. जामनेरची जागा 1990 ला आमच्याकडे होती आणि ती केवळ 2000 मतांनी पडली होती. 1995 ला ती जागा भाजपाला दिली. असं राजकारणात होत राहतं. ज्या पद्धतीनं पक्षाच्या बैठकीत ठरतं त्या पद्धतीनं निर्णय घेतले जातात. निर्णय सामूहिक होत असतात. आमची जागा होती, पण तिथलं वातावरण आणि बाकी गोष्टी पाहिल्या गेल्या असतील तेव्हाच ती जागा भाजपाला सोडली. शेवटी निवडून येणं हा नियम सगळ्यात महत्वाचा आहे. आजची स्थिती काय आहे हे त्यांनी पाहिलं असेल. इतर निवडणुकांचा अंदाज यावरुन लावता येणार नाही. या एका जागेपुरताच हा विषय आहे," असं गुलाबराव पाटील अंधेरी पूर्व ही जागा शिंदे गट का लढवणार नाही हा प्रश्न विचारल्यावर म्हणाले.
शिवसेनेची उमेदवारी ऋतुजा लटके यांना
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अंधेरी पूर्व ची उमेदवारी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेनं त्यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात सहानुभूतीचा फायदा मिळण्याची अपेक्षा ठेवली आहे. असं म्हटलं जातं की लटके यांना शिंदे गटाकडूनही त्यांच्याकडे आणण्याचा प्रयत्न झाला होता, पण ऋतुजा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच थांबण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेच्या या उमेदवाराला राष्ट्रवादी कॉंग्रेसनंही पाठिंबा दिला आहे. या भागात कॉंग्रेसचीही ताकद आहे. कॉंग्रेसही सेनेलाच पाठिंबा देणार आहे. कोल्हापुरात कॉंग्रेसच्या आमदाराच्या निधनानंतर जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा सेनेनं तिथं उमेदवार असलेल्या त्या आमदारांच्या पत्नीला पाठिंबा दिला होता. कॉंग्रेस तसंच अंधेरी पूर्व मध्ये करणार आहे.
पण तरीही शिवसेनेसमोर मुख्य प्रश्न हा असेल की जर या पोटनिवडणुकीपर्यंत निवडणूक आयोगाचा निर्णय आला आणि चिन्हं गोठवलं गेलं, तर नव्या चिन्हासह त्यांना लढावं लागेल.
सध्यातरी ही केवळ शक्यता आहे. पण दुसरीकडे ही निवडणूक उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपा अशीच मुख्यत्वे असणार आहे. येण्या-या मुंबई महापालिका निवडणुकीत काय होऊ शकतं याचा अंदाज या एका पोटनिवडणुकीतून येईल.