रकमेच्या दुप्पट परतावा देण्याचा दावा करत ३५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या सूत्रधाराला नागपूरपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुशील कोल्हे असे आरोपीचे नाव असून मागील दोन वर्षांपासून तो फरार होता. त्याने एजीएम कार्पोरेशन, एजीएम डिजीटल लिमीटेड, जनसेवा म्युचुअल बेनिफीट निधी व इतर शेल कंपन्या स्थापन करून त्यामाध्यमातून फसवणूक केली होती. त्याच्या अटकेने या प्रकरणातील इतर लोकांचीही नावे समोर येऊ शकतात.
सुशील कोल्हे याने त्याचा भाऊ पंकज, भागीदार भरत शंकर साहू आणि इतरांच्या मदतीने सिव्हिल लाइन्समध्ये एजीएम कॉर्पोरेशन, एजीएम डिजिटल लि., जनसेवा म्युचुअल बेनिफीट निधी या कंपन्या सुरू केल्या. कोल्हे बंधू डिजिटल मार्केटिंगमध्ये भरपूर नफा असल्याचे सांगून गुंतवणुकीची माहिती देत असत.
तथाकथित योजनांवर १८ महिन्यांत गुंतवणुकीच्या दुप्पट, मूळ रकमेच्या अडीच टक्के आणि ४० महिन्यांपर्यंत अडीच टक्के परतावा आणि बोनस मिळेल असा दावा करायचे. पॉश हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन लोकांना आकर्षक भेटवस्तू द्यायचे. त्यामुळे लोक गुंतवणूक करू लागले. सुरुवातीला आरोपींनी लोकांना वेळेवर नफा दिला. त्यामुळे त्याचे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरले. शेजारील राज्यातून लोक मोठ्या संख्येने येऊ लागले. काही वेळाने कोल्हे बंधूंनी पैसे परत करण्यास विलंब सुरू केला.