बिग मी इंडिया प्रा. लि. कोट्यवधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणतोय ‘बायको मला सोडून गेलीय !

गुरूवार, 3 मार्च 2022 (21:38 IST)
राज्यभरातील गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून आर्थिक घोटाळा करणारा सोमनाथ राऊत पोलिस तपासात काहीही माहिती देत नाही. त्याने बिग मी इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून गुुंतवणूकदारांची जादा परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली आहे. इतर आरोपी व घोटाळ्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. बायको सोडून गेली असून कर्मचाऱ्यांनीच घोटाळा केल्याचे तो सांगत आहे. सोमनाथ राऊत याने बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून टीव्हीवर जाहिरातबाजी केली.
 
या कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. १ लाख रुपये गुंतवले, तर दररोज तीनशे ते दीड हजार रुपये परतावा बँकेमार्फत देण्याचे आमिष दाखवले होते. तसा लेखी करार नोटरीपुढे करून दिलेला होता. त्यामुळे राज्यातील हजारो गुंतवणूकदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली. काही महिन्यांपूर्वी मात्र सोमनाथ राऊतने अचानकपणे कंपनीचा गाशा गुंडाळला. त्यामुळे गुंतवणुकदार चकरा मारू लागले. कोल्हापूर येथील एक तक्रारदार सतीश खोंडवे (रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. इतर तक्रारदारही समोर आले.
त्यामुळे तोफखाना पोलिसांनी सोमनाथ राऊत व त्याची पत्नी सोनिया (दोघे रा. माऊली रेसिडेन्शी, सावेडी, मूळ रा. पाथरवाला, ता. नेवासे), वंदना पालवे (केडगाव), सुप्रिया आरेकर (बुऱ्हाणनगर), प्रितम शिंदे (पुणे), प्रिती शिंदे (बालिकाश्रम रस्ता, अहमदनगर), सॉल्यमन गायकवाड (अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवलेला आहे. परंतु, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तोफखाना पोलिसही या गुन्ह्यातील आरोपींच्या मागावर आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोमनाथ राऊतला अटक केली.
अधिक तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, पोलिस चौकशीत सोमनाथ काहीच ठोस माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.आपली पत्नी आपल्याला सोडून गेली आहे, तिचा फोन, पत्ता माहिती नसल्याचे तो सांगताे. तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच पैसे हडपल्याचे त्याचे म्हणणे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती