शिवसेनेची ऑफर स्विकारली का? संभाजीराजेंनी सांगितले...

मंगळवार, 24 मे 2022 (15:50 IST)
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीचा तिढा अजूनही कायम आहे. अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. आमच्यात बोलणं झालं आहे. पुढे काय करायचंय तेदेखील ठरले आहे. उद्धव ठाकरे त्याप्रमाणेच वागतील, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील, असे संभाजीराजे यांनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सांगितले.
 
यावेळी संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबत मोजक्या पण सूचक शब्दांत भाष्य केले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
 
संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पाठिंबा हवा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली आहे. त्यासाठी संभाजीराजे यांना सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठी या, असेही सांगण्यात आले होते. मात्र, संभाजीराजे छत्रपती हा प्रस्ताव नाकारून मुंबईतून कोल्हापूरला निघून आले होते. त्यामुळे संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती