राज्यसभा निवडणूकः शिवसेनेने जाहीर केली ही भूमिका; संभाजीराजेंचे काय होणार?

सोमवार, 23 मे 2022 (21:24 IST)
राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी 42 मतांची तजवीज केली आहे का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमचा संभाजीराजेंना विरोध नसल्याचेही राऊत म्हणाले.
 
राऊत म्हणाले की, मला बाकी काही माहिती नाही पण शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास आहे. यावेळी शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेत जाणार असल्याचेही राऊत म्हणाले. अनेक वर्षापासून शिवसेना राजकारणात असून सद्यस्थितीत तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील दोन जागा शिवसेना लढवणार आहे. या दोन्ही ठिकाणी आम्ही शिवसेनेचे उमेदवार देऊ आणि दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवारच निवडून येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
 
कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. जेव्हा एखादा उमेदवार लढणार असल्याचे जाहीर करतो, तेव्हा त्याला निवडून येण्यासाठी आवश्यक मतांची बेरीज केलेली असते. निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज लागते. त्या मतांची जमवाजमव संभाजीराजेंनी केली असेल म्हणूनच ते खात्रीने लढणार असल्याचे सांगत असावे असेही राऊत यावेळी म्हणाले. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, कारण या आमच्या जागा आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले.
 
आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही मग ते कोणीही असो असे स्पष्ट करतानाच आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे असे राऊत यांनी स्पष्ट केले. शिवाय, संभाजीराजे यांनी आम्ही सांगितले आहे की तुम्ही शिवसेनेत या आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा. कारण राज्यसभेत शिवसेनेचा एक खासदार वाढवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले आहे. तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले मागं जातो, तुम्ही छत्रपती आहात असेही राऊत संभाजीराजेंना उद्देशून म्हणाले. याबाबत ते निर्णय घेतीलच. पण परिस्थिती काहीही असो दोन उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला आहे. तसेच हे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती