केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा पुण्यात दाखल झाले आहेत. सहकार मंत्रालयाच्या केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलच्या लॉन्च कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. आणि त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. यावेळी त्यांनी अजित पवारांना गंमतीने सांगितले की, दादा तुम्ही खूप दिवसांनी योग्य ठिकाणी बसला आहात.असं म्हणत त्यांनी सभागृहातील वातावरण सहज केले. त्यांनी असे म्हटल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाटासह हशा पिकला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात भेट घेतली. शाह यांनी कार्यक्रमात सांगितले की, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादा (अजित पवार) पहिल्यांदाच आले असून त्यांच्यासोबत मी पहिल्यांदाच स्टेजवर कार्यक्रम करत आहे. मला त्यांना सांगायचे आहे, दादा तुम्ही खूप कालावधीनंतर योग्य ठिकाणी बसला आहात. जागा बरोबर होती, पण आपण यायला उशीर लावला." त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात हशा पिकला. त्यांनी महाराष्ट्राला देशाची सहकारी राजधानी असे म्हटले.
सहकारी संस्थांची देखरेख करणाऱ्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) चा कार्यक्रम आजपासून पूर्णपणे डिजिटल होणार आहे. आता कोणत्याही बहुराज्यीय सहकारी संस्थेला शाखा वाढवण्यासाठी, दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.