पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या 'तिसऱ्या टर्मविषयी भाष्य केलं आणि रविवारी (30 जुलै) भारतीय जनता पक्षाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे.
रमण सिंग यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाच्या संघटनेत सामील करण्यात आलं आहे. तर तारिक मन्सूर आणि अब्दुल्ला कुट्टी यांच्याकडे भाजपचे नवे मुस्लिम चेहरे म्हणून पाहिलं जात आहे.
भाजपच्या कार्यकारिणीत हे बदल या वर्षी होणाऱ्या 5 विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले आहेत. सोबतच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकाही डोळ्यासमोर ठेवून हे बदल करण्यात आले आहेत.
पक्षाची विचारधारा आणि मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षांतील कामगिरीमुळे निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळू शकतील, हे लक्षात घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणीत हे बदल करण्यात आले आहेत, असं भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचं म्हणणं आहे.
उत्तर प्रदेशच्या 80 जागांवर लक्ष
लोकसभा निवडणुकीतील 80 जागांवर लक्ष ठेवत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उत्तर प्रदेशला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. येथील 8 सदस्यांचा नव्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणीत 3 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 1 सचिव, खजिनदार आणि सहसचिव हे उत्तर प्रदेशचे आहेत.
नव्या कार्यकारिणीमध्ये खासदार रेखा वर्मा, खासदार लक्ष्मीकांत वाजपेयी आणि तारिक अन्वर यांना उपाध्यक्ष करण्यात आलं आहे. तर अरुण सिंह आणि गोरखपूरचे 5 वेळा आमदार असलेले विद्यमान राज्यसभा खासदार राधामोहन दास अग्रवाल यांचा राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या यादीत समावेश आहे.
त्याचबरोबर सुरेंद्र सिंह नागर यांना राष्ट्रीय सचिव करण्यात आलं आहे. तर राजेश अग्रवाल यांची कोषाध्यक्ष आणि शिवप्रकाश यांची सहराष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
निवडणूक असलेल्या राज्यांवर नजर
यंदा तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नवीन नेमणुका करतात हेही ध्यानात ठेवण्यात आलं आहे.
भाजपने अलीकडेच आपल्या 4 केंद्रीय मंत्र्यांना या राज्यांचे निवडणूक प्रभारी बनवलं आहे. आता राष्ट्रीय कार्यकारिणीतही या राज्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्षपदासाठी छत्तीसगडचे सर्वाधिक 3 प्रतिनिधी आहेत. यात माजी मुख्यमंत्री रमण सिंह, सरोज पांडे आणि लता उसेंडी आहेत.
इतर तीन राज्यांमधून प्रत्येकी एकाला प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, मध्य प्रदेशातील सौदान सिंग आणि तेलंगणातील डीके अरुणा यांचा संघटनेत समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर मध्य प्रदेशातून कैलाश विजयवर्गीय, राजस्थानमधून सुनील बन्सल आणि तेलंगणातून संजय बेदी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदावर नेमणूक करण्यात आली आहे.
राजस्थान आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका चेहऱ्याचा राष्ट्रीय सचिवांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ नव्या टीममध्ये 38 पैकी 11 नावे या चार राज्यांतील आहेत.
नवीन कार्यकारिणी कोणाची टीम आहे?
भाजप अध्यक्षांच्या शिफारशीवरून पक्षाच्या कार्यकारिणीत सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची यात प्रमुख भूमिका आहे?
ज्येष्ठ पत्रकार राधिका रामाशेषन सांगतात, "ही एक सामूहिक जबाबदारी आहे. पंतप्रधान मोदी एक आणि अमित शहा काहीतरी दुसरा विचार करतात असं म्हणणे पूर्णपणे चुकीचं ठरेल. दोघेही एका तगड्या टीमसारखं काम करत आहेत आणि जेपी नड्डा त्यांच्या आदेशांचं पालन करत आहेत. ही पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची टीम आहे"
तारिक मन्सूर कोण आहेत?
या सगळ्यांत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समाविष्ट असलेला मुस्लिम चेहरा तारिक मन्सूर यांचं नाव चर्चेत आहे.
ते उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू राहिले आहेत.
बुक्कल नवाब, मोहसीन रझा आणि दानिश आझाद अन्सारी यांच्यानंतर 2017 पासून भाजपनं विधान परिषदेवर पाठवलेले ते चौथे मुस्लिम सदस्य आहेत.
त्यांच्या कुलगुरू पदाच्या कार्यकळात अलीगड मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात निदर्शनं झाली होती. त्यानंतर प्रथमच पोलीस विद्यापाठीच्या परिसरात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभं न राहिल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
ज्येष्ठ पत्रकार राधिका सांगतात, "तारिक मन्सूर हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. दाराशिकोहच्या कबरीचा शोध घेण्याची संकल्पना त्यांनीच मांडली आहे. त्यांची संकल्पना भाजपला आवडलीय आणि त्यामुळेच त्यांचा संघटनेत समावेश करण्यात आला आहे."
मुख्तार अन्सारी आणि शाहनवाज हुसैन यांच्यानंतर भाजपलाही मुस्लिम प्रतिनिधीची गरज होती, असं दिसून येत असल्याचं त्या सांगतात.
पसमांदा मुस्लिमांमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी तारिक मन्सूर काम करतील, असं म्हटलं जात आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद जोशी यांच्या मते, "मुस्लिमांच्या मोठ्या वर्गाला ते आकर्षित करू शकतील असं सध्या तरी वाटत नाहीये, पण ही सुरुवात असू शकते."
राधिका यासुद्धा प्रमोद जोशींच्या बोलण्याशी सहमत आहेत. त्या सांगतात, "तारिक मन्सूर यांचा संघटनेत समावेश झाल्यानंतर पसमांदा मुस्लिमांचा भाजपकडे कल वाढेल, असं वाटत नाही."
भाजपमध्ये उपाध्यक्षपद हे फारसं महत्त्वाचं नसल्यानं त्यांचं प्रतिनिधित्व केवळ प्रतीकात्मक असल्याचं त्या सांगतात.
दुसरीकडे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद जोशी यांना या नियुक्त्यांमध्ये सोशल इंजिनिअरिंगचं बदलतं चित्र दिसतं.
ते सांगतात, "भाजप आतापर्यंत मुस्लिमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून राजकारणात पुढे जात होता. पण आता हळूहळू मुस्लिमांकडेही जावे लागेल, हे पक्षाला दिसत आहे. कारण भाजपविरोधी आघाडी अगदी ताकदीनं समोर येत आहे.”
केरळला प्रतिनिधित्व
केरळमधील अब्दुल्ला कुट्टी यांनाही भाजपच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे.
प्रमोद जोशी सांगतात, "कार्यकारिणीत राष्ट्रीय प्रतिमा दाखवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. त्यांना दक्षिणेतील नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश करायचा आहे. शनिवारीच त्यांनी तामिळनाडूमध्ये 6 महिन्यांची पदयात्रा सुरू केली आहे. केरळ हे नवीन क्षेत्र आहे. कुट्टी यांच्यासोबतच एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
राधिका सांगतात, "केरळच्या दृष्टिकोनातून त्यांचा समावेश करण्यात आला आहे पण तेही केवळ प्रतीकात्मक आहेत."
मुख्तार अब्बास नक्वी यांनाही भाजपमध्ये मुस्लिमांचे प्रतिनिधी म्हणून आणण्यात आलं होतं. ते उत्तर प्रदेशात शिया मते खेचून आणतील, अशी अपेक्षा होती.
राधिका सांगतात, नक्वी यांनी एकदा रामपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली. पण तेव्हा संघ आणि विश्व हिंदू परिषदेनेही सर्व हिंदू मते त्यांच्या बाजूने जावीत यासाठी खूप मेहनत घेतली.
भाजपमधील अल्पसंख्याक प्रतिनिधित्वाची कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे या नियुक्त्या आहेत, असं राधिका आणि प्रमोद दोघांना वाटतं.
वसुंधराराजे आणि रमण सिंग यांच्या समावेशाचा अर्थ
भाजपच्या कार्यकारिणीत वसुंधराराजे आणि रमण सिंग हे उपाध्यक्ष राहिले आहेत.
राधिका सांगतात, "छत्तीसगडमधून रमण सिंग यांची नेमणूक करणं अपेक्षेनुसार आहे. पण वसुंधराराजे यांचा कार्यकारिणीत समावेश होणं आश्चर्यकारक आहे."
राधिका पुढे सांगतात, "राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या झालेल्या सर्व सभांमध्ये वसुंधराराजे नेहमी मंचावर उपस्थित होत्या. त्यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी घोषणा झाली नसली तरी विधानसभा निवडणूक जिंकल्यास त्यांनाच संधी मिळेल, असा संदेश यातून गेला आहे. पण, संघटनेत त्यांचं नाव पाहून मला जरा विचित्र वाटलं."
मग राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंची विशेष भूमिका असणार नाही का?
यावर राधिका सांगतात, "मला वाटत नाही. असं करणं योग्य होणार नाही. राजस्थानमध्ये त्यांची भूमिका असेलच. उपाध्यक्ष हे काही पूर्णवेळ पद नाहीये. या पदाकडे कोणतीही विशिष्ट जबाबदारी नसते, तसंच कोणतीही कार्यकारी शक्ती नसते. वसुंधरा उपाध्यक्ष राहतील पण राजस्थानमध्येही सक्रिय असतील. भाजप त्यांना बाजूला करू शकणार नाही."
निम्म्या लोकसंख्येचा सहभाग किती?
भाजपच्या या यादीत एकूण 38 नावं आहेत. यामध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस, 13 राष्ट्रीय सचिव, एक संघटन सरचिटणीस, एक सहसंघटन सरचिटणीस, एक कोषाध्यक्ष आणि एक सहकोषाध्यक्ष यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एकूण सदस्यांची संख्या 39 होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यापैकी केवळ 9 महिला आहेत. तर कार्यकारिणीत महिलांचा सहभाग 23% आहे.
हे स्वतः भाजपच्या आश्वासनांच्या विपरित आहे. कारण पक्ष नेहमीच महिलांच्या 33% सहभागाबद्दल बोलत आला आहे. राष्ट्रीय सरचिटणीसांच्या यादीत एकाही महिलेचं नाव नाही.
भाजपच्या या कार्यकारिणीत महिलांना योग्य सहभाग मिळाला आहे का?
राधिका यांच्या मते, "महिलांना योग्य प्रतिनिधित्व न दिल्यामुळे भाजप स्वत:चंच आश्वासन पूर्ण करू शकत नाहीये. भाजप नेहमी म्हणत आला आहे की, भलेही विधिमंडळात स्थान नाही मिळाले, तरी ते त्यांच्या संघटनेत महिलांना 33 % प्रतिनिधित्व नक्कीच देतील. भाजप संघटनेत अनेक महिलांचाही समावेश करण्यात आला आहे, मात्र त्यात सातत्याने घट होत आहे.”
भाजपमध्ये सक्षम महिलांची कमतरता आहे की आगामी काळात संघटनेत बदल होणार?
राधिका सांगतात, "भाजपकडे सक्षम महिलांची कमतरता आहे असं नाही. जर त्यांनी दक्षिणेकडं पाहिलं तर त्यांच्याकडे तीक्ष्ण बोलू शकतील अशा महिला आहेत."
राधिका पुढे सांगतात, "महिला किंवा दलितांचा सहभाग कमी करणं हा रणनीतीचा भाग अजिबात होऊ शकत नाही. महिलांचा सहभाग कमी करण्यावर टीका नक्कीच होईल, त्यामुळे कदाचित आगामी काळात आणखी काही नावं जोडली जातील. महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी भाजप नक्कीच काहीतरी करेल, असं मला वाटतं.”
2024 साठी ही कार्यकारिणी कशी आहे?
2024 च्या निवडणुकीला अजून वेळ आहे, त्यामुळे पुढे या कार्यकारिणीत काही बदल होणार का?
या प्रश्नावर ज्येष्ठ पत्रकार राधिका रामाशेषन सांगतात, "लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा बदल निश्चितच नाहीये. निवडणुकीला अजून बराच वेळ आहे. त्यामुळे महिलांची कमतरता आहे की नाही हे भाजप पाहिल. अशा बदलाचा समाजात काय संदेश जात आहे, याची भाजप पूर्ण काळजी घेतं. हे लक्षात घेऊन भाजप बदल करतं. त्यामुळे त्यात दलित, आदिवासी, ओबीसी यांचा समावेश करण्यात येऊ शकतो."
भाजप सरचिटणीसपदावर आणखी कोणाला सामावून घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आगामी काळात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणखी काही बदल होतील का?
यावर प्रमोद जोशी सांगतात, "भाजप झपाट्यानं बदलाच्या टप्प्यातून जात आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात काही नवीन चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो, तर काही जुन्या चेहऱ्यांना संघटनेच्या कामासाठी नियुक्त केलं जाऊ शकतं. "