Tamil Nadu News : तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. येथील एका फटाका कारखान्याच्या गोदामात स्फोट झाला. यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 10 लाखांचा माल जळून खाक झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. स्फोटामुळे परिसरातील काही दुकाने आणि घरांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफकडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कृष्णगिरी जिल्ह्यातील पलायपेट्टई येथे घडली. कृष्णगिरीचे एसपी सरोज कुमार ठाकोर यांनी सांगितले की, पलायपेट्टई भागात रवी नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. आग आजूबाजूच्या दुकाने आणि घरांमध्ये पसरली. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. मौल्यवान जीवितहानी झाली. या कठीण प्रसंगी माझे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत.