दाभोलकर हत्या प्रकरण, 5 आरोपींवर आरोप निश्चित; ‘त्यांना’ मात्र गुन्हा कबूल नाही

बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (16:16 IST)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आज पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहे. मात्र आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील अडचणींमुळे औरंगाबाद कारागृहात असलेला सचिन अंदुर,आणि आर्थर रोड कारागृहात असलेला शरद कळसकर या दोघांना पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपींना गुन्हा कबुल नसल्याने त्यावर आता 30 सप्टेंबरला सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार आहेत.
 
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.नावंदर यांच्या न्यायालयापुढे ही सुनावणी झाली.कोरोनाचे कारण सांगून आरोपींनी वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली.त्यावर न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार देत आरोप निश्चिती झाली असून,गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा आरोपींना केली.त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
 
या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते, तर आरोपी संजीव पुनाळेकर व विक्रम भावे  प्रत्यक्ष उपस्थित होते.सीबीआय तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी  आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर  यांनी कामकाज पाहिले.या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे ,सचिनअंदुरे,शरद कळसकरयांच्याविरोधात आरोपींवर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत.आरोपी अ‍ॅड.संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती