वाकड परिसरात एका धक्कादायक घटनेत 30 वर्षीय तरुणी जेव्हा आपल्या भावासह घरी जात होती तेव्हा अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने तिच्यावर अश्लिल शेरेबाजी केली. नंतर बळजबरीने मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात धाव घेऊन अज्ञात डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नेपाळ येथील आहे. ती आणि तिचा भाऊ चायनीज विकण्याचा गाडा चालवून पोट भरतात. रात्री उशिरा त्यांचा गाडा बंद झाल्यावर सोमवारी मध्यरात्री साडे अकारा- बाराच्या सुमारास भाऊ- बहीण दोघे ही घरी जात होते. रस्त्यावरील कुत्रे भुंकत असल्यामुळे भाऊ कुत्र्यांना हकलवत होता तेव्हाच अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने बेसावध तरुणीच्या जवळ येत अश्लील शेरेबाजी केली आणि आपल्या गाडीवरुनच एका हाताने मिठी मारून गालाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. अश्लीश चाळे करण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या भावाला पाहताच डिलिव्हरी बॉय फरार झाला.