लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणार्‍या तरुणीने प्रियकराचा घोटला ‘गळा’; पुण्याच्या फुरसुंगीमधील घटना

गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (15:53 IST)
ती बीडची, तो अमरावतीचा, दोघेही स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आलेले. अभ्यास करता करता त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन ते गेल्या ३ -४ वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये एकत्र राहु लागलेले. पण गेल्या काही दिवसांत त्यांच्यात वादावादी, भांडणे वाढू लागली. एकमेकावरील संशय वाढू लागला. त्यातून झालेल्या भांडणात तिने त्याचा गळा दाबला अन त्याला भिंतीवर ढकलले. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. पण, तिने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर बनली अन त्यातच त्याचा मृत्यु झाला. आता हडपसर पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे.
 
रोहिणी रामदास युनाते (वय २४, रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. सोनल पुरुषोत्तम दवाडे (वय ३४) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी सोनलचा भाऊ निवास पुरुषोत्तम दवाडे (वय ३०, रा. घोटा, ता. तिवसा, जि. अमरावती) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी युनाते ही मुळची बीडची राहणारी असून दवाडे हा अमरावतीचा राहणारा होता.दोघेही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असताना पुण्यात त्यांची ओळख झाली.गेल्या ३ वर्षांपासून ते फुरसुंगीमध्ये ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये रहात होते.सध्या दोघेही नोकरी करत होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये भांडणे होत होती.दोघेही हातघाईवर येत होते. एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.
 
 २७ ऑगस्ट रोजी त्यांच्यात एकमेकांवरील संशयावरुन भांडणे झाली.तेव्हा रोहिणीने सोनलचा गळा दाबला व त्याला भिंतीवर ढकलून दिले.
त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. तो तसाच निपचित पडून होता.तसेच त्याला ताप आला असल्याने तो झोपला. दरम्यान, भांडणाच्या रागातून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दुसर्‍या दिवशी ती उठून कामाला निघून गेली.२८ ऑगस्टला त्याची तब्येत खालावून त्यात त्याचा मृत्यु झाला.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.शवविच्छेदनात गळा दाबल्याने व डोक्याला मार लागल्याने मृत्यु झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला.त्यावरुन चौकशी केल्यावर तपासात रोहिणी हिने गळा दाबल्याचे व भिंतीला ढकलल्याचे सांगितले.हडपसर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती