मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांना दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे आता भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.
पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात संचारबंदी
गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत कलम 144 लागू असेल.
पुणे शहरामध्ये 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 पर्यंत जमावबंदी तसेच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले गेले आहेत. सर्व धर्माची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गणेशोत्सवासाठी पुणे शहरामध्ये फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी लागू केले आहेत.