पुणे : अल्पवयीन मुलीवर 2 दिवस सामूहिक बलात्कार, 13 जण अटकेत
गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (14:16 IST)
- राहुल गायकवाड
'घरी सोडतो' असं म्हणत एका 14 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुण्यात घडली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी एकूण 13 जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आठ जणांना अटक केली होती. त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आता आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टला ही 14 वर्षीय मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी पुणे रेल्वेस्टेशन जवळ आली होती. तिचा मित्र भेटण्यासाठी आला नाही.
दरम्यान, मुलगी एकटी असल्याचं पाहून एका रिक्षावाल्याने घरी सोडतो असं म्हटलं.
मुलीला रिक्षात बसवून रिक्षा चालकाने तिला भलतीकडेच नेलं. त्यानंतर त्याच्या साथीदारांना बोलावून दोन दिवस विविध ठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून दिलं.
पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत याप्रकरणी अधिक माहिती दिली. पाटील म्हणाल्या, "मुलीच्या वडीलांनी दुसऱ्या दिवशी मुलगी हरवल्याची तक्रार वानवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब घेतला. तिच्या जबाबातून आठ जणांना पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपींना न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे."
मुलीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मुलीची आणि आरोपीची कुठलीही पूर्वीची ओळख नव्हती.
आरोपींपैकी काही रिक्षाचालक आहेत, तर 2 जण रेल्वे कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली.
'पूजा चव्हाण प्रकरणाचा असा तपास का झाला नाही?'
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास केला असून चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांचं कौतुक केलं. पण याचवेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्न उपस्थित केले.
चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण घटनेचा मात्र अशा पद्धतीने जलद गतीने तपास का केला नाही असा प्रश्न विचारला आहे. त्या म्हणाल्या, "हेच पुणे पोलीस आहेत आणि हेच ते मुख्यालय आहे. संजय राठोड प्रकरण इथेच झालं. आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही."
पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. यात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांचा राजीनामा सुद्धा घेण्यात आला.