डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून देशभरात आंदोलनं सुरू असतानाच मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्येही महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमधील (सायन हॉस्पिटल) महिला डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचं समोर आलंय.
पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या आरजी कर रुग्णालयात महिला डाॅक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेविरोधात देशभरातील आंदोलन पुकारलेलं असतानाच मुंबईत डॉक्टरवर हल्ल्याची घटना घडल्यानं संताप व्यक्त होतोय.
लोकमान्य टिळक हाॅस्पिटलमधील (सायन हाॅस्पिटल) इएनटी विभागात रविवारी (18 ऑगस्ट) पहाटे साडेतीन वाजता रुग्णासोबत अचानक पाच ते सहा जण आले.
यावेळी रात्रीच्या ड्युटीसाठी वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये महिला डाॅक्टर कार्यरत होत्या. रुग्णाच्या नाकाला आणि ओठाला दुखापत झालेली होती.
संबंधित रुग्णाला ड्रेसिंग करत असताना जखम दुखावली गेल्याचं सांगत, त्यांनी महिला डाॅक्टरला शिवीगाळ केली. तसंच, रुग्णासोबत असलेल्या महिलेने डाॅक्टरला मारहाण केली आणि रुग्णासाठी वापरलेला रक्ताचा कापसाचा बोळा महिला डाॅक्टरच्या गालावर लावला.
या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'ती खूप घाबरली आहे आणि बोलण्याच्याही मनस्थितीत नाही' संबंधित महिला डाॅक्टरला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे, असं तिच्या जवळच्या नातेवाईकाने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
या धक्क्यामुळेच महिला डाॅक्टर कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नसून सुरक्षेसाठी आपलं नाव गुप्त ठेवावं असं त्यांना वाटतं.
संबंधित डाॅक्टर इएनटीच्या एमबीबीएस डाॅक्टर असून सायन हाॅस्पिटलमध्ये त्या गेल्या दोन वर्षांपासून निवासी डाॅक्टर म्हणून काम पाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांनी आपलं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं असून त्या आता इनएनटीमध्येच एमडीचं शिक्षण घेत आहेत.
महिला डाॅक्टरच्या नातेवाईकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तिच्या (महिला डाॅक्टरच्या) वाॅर्डमध्ये काही लोक दोन गटात मारामारी करून आले होते. त्यापैकी एकाच्या चेहर्याला दुखापत होती."
ते पुढे म्हणाले की, "चेहर्यावर काही काचा घुसल्याने रुग्णाला इएनटी विभागात जाण्यास सांगितलं आणि रुग्ण त्याच्यासोबत चार-पाच लोक तिच्याकडे गेले. तिची नाईट ड्युटी होती. ते भांडण करून आले होते, दारू प्यायलेले होते. दुखापत तपासण्यासाठी महिला डाॅक्टरने हात लावल्यानं त्यांना दुखलं असावं म्हणून त्यांनी अत्यंत वाईट शब्द वापरले, शिवीगाळ केली. रुग्णासोबत एक महिला होती. त्यांनी अंगावर यायला सुरुवात केली.
"ड्युटीवर असणाऱ्या नर्सनी त्यांना समजावलं, पण पहाटेची वेळ असल्याने इतर कोणी वाॅर्डमध्ये नव्हतं. सोबत आलेल्या महिलेने डाॅक्टरच्या हाताला नखं मारली. तसंच, पेशंटला लावलेले रक्ताचे कापसाचे बोळे तिच्या गालावर दोनवेळा लावले. तोपर्यंत सुरक्षारक्षक वाॅर्डमध्ये पोहोचले. मात्र, रुग्णासह नातेवाईकांनी तिकडून पळ काढला. याबाबत पोलीस ठाण्यात रुग्णालयाकडून तक्रार नोंदवली आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे."
ते पुढे सांगतात, "तिचं वय 27-28 आहे. ती अजून लहान आहे. डाॅक्टर म्हणून आता कुठे तिने काम सुरू केलं होतं. यामुळे अशा घटनेने तिला धक्का बसला आहे. याचा परिणाम आपल्या करिअरवर होऊ नये अशीही तिला भीती आहे. ती खूप हुशार आणि मेहनती मुलगी आहे. तिला अपेक्षितच नव्हतं की आपल्यासोबत ड्युटीवर असताना असं काही घडेल."
पोलिसांच्या तपासात काय आढळलं?
सायन हाॅस्पिटल येथील महिला डाॅक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणी हाॅस्पिटलकडून सायन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "सायन रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक तीनमधील डॉक्टर्स रुममध्ये प्रसाद नावाच्या पेशंटच्या चेहऱ्याला ड्रेसिंग करत असताना पेशंटला दुखल्यामुळे पेशंट ओरडू लागला. शिवीगाळ करु लागला. त्यावेळी पेशंटच्या महिला नातेवाईकाने डॉक्टरसोबत वादाला सुरुवात केली. सदर महिला नातेवाईकाने पेशंटसाठी वापरलेला कापसाचा बोळा डॉक्टरांना लावला. तसंच, मारहाण करण्यास सुरुवात केली. यात महिला डॉक्टरच्या डाव्या हाताला खरचटून दुखापत झालीय."
या प्रकरणी महिला डाॅक्टरांनी रुग्ण प्रसाद देवेंद्र आणि त्यांच्या महिला नातेवाईकाविरोधात तक्रार नोंदवली असून त्यानुसार सायन पोलीस ठाण्यात कलम 115(2), 352, 3(5), भारतीय न्याय संहिता कलम 3, 4, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेच्या हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम 2010 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसंच, पोलिसांनी महिती दिली की, आरोपी प्रसाद आणि महिला नातेवाईक गुन्हा करून तेथून पळून गेले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असून त्यांना भारतीय न्याय सुरक्षा संहिता 2023 कलम 35(3) आणि नोटीस देण्यात आली आहे.
तसंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस ताब्यात घेणार आहेत.
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. मोहन जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सायन हाॅस्पिटलमध्ये एकूण 218 सुरक्षारक्षक आहेत. यामुळे सुरक्षा कमी आहे असं नाहीय. तरीही सुरक्षारक्षक वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तसंच, आम्ही अशा घटनेवर तात्काळ कारवाई व्हावी म्हणून सुरक्षारक्षकांना अधिक सतर्क राहण्याची सूचना केली आहे. महिला डाॅक्टरवरील हल्ल्याच्या वेळेस सुरक्षारक्षक वेळेत तिथे पोहोचले. त्यांना उशीर झाला नाही. परंतु घटना पाहता सुरक्षा वाढवण्यासाठी आम्ही प्रस्ताव देवू."
'शिव्यांची सवय झालीय'
कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात गेल्या आठ दिवसांपासून (12 ऑगस्टपासून) विविध सरकारी रुग्णालयातील डाॅक्टर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
कामाच्या वेळेत डाॅक्टरांवर होणारे हल्ले विशेषत: महिला डाॅक्टरांची कामाच्या ठिकाणी सुरक्षा या मागणीसाठी देशभरात डाॅक्टरांनी आंदोलन पुकारलं आहे. अशातच ही घटना घडल्याने डाॅक्टरांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
बीबीसी मराठीची टीम सायन रुग्णालयात पोहोचली, त्यावेळी महिला डाॅक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून त्याठिकाणी डाॅक्टरांचं आंदोलन सुरू होतं.
सायनमध्ये महिला डाॅक्टरसोबत घडलेल्या प्रकारानंतर प्रशासनाने तात्काळ सुरक्षेसाठी पावलं उचलावीत अशी महिला डाॅक्टर आणि नर्सची मागणी आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना सायन रुग्णालयाच्या डाॅक्टर सोनल यांनी सांगितलं, "आमच्या महिला डाॅक्टरसोबत अतिशय वाईट घडलं. तिला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. तिच्या चेहर्याला रक्ताचे बोळे लावण्याचा प्रयत्न झाला. त्या महिला डाॅक्टरने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही इथे आंदोलन करत असताही या घटना घडत आहेत म्हणजे हा विषय किती गंभीर आहे."
त्या पुढे सांगतात, "सरकारी डाॅक्टरांवर कामाचं इतकं ओझं असतं की, काही वेळेला 48 तास सलग ड्युटी करावी लागते. मग त्यांना किमान सुरक्षा नको का द्यायला? अनेकदा जमाव येतो, तो सुरक्षारक्षकांवरही हल्ला करतो. रात्रीच्या ड्युटीसाठी स्वतंत्र खोल्या नाहीत. आम्ही वारंवार मागणी करूनही याची दखल घेतली जात नाही."
एका निवासी महिला डाॅक्टराने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "शिवीगाळ ऐकण्याची आता सवय झाली आहे. इतक्यांदा रुग्ण किंवा नातेवाईकांकडून शिव्या ऐकाव्या लागतात."
त्या सांगतात, "आम्ही वाॅर्डमध्ये असतो, तेव्हा अनेकदा पूर्ण वॉर्डमध्ये आम्ही एकट्याच असतो. अनेकदा सुरक्षारक्षकही नसतात. रुग्णासोबत अनेक लोक येतात. रात्रीच्या वेळी स्टाफ कमी असतो. अशावेळी आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांना सांभाळायचं की, रुग्णावर उपचार करायचे? अशी परिस्थिती असते."
"अपघातग्रस्त, नशा करणारे, दारू प्यायलेले सर्व प्रकारचे रुग्ण असतात. अनेकदा नातेवाईक आक्रमक होतात, त्यांना कसं सांभाळायचं? आमच्या सुरक्षेचं काय?"
मार्ड (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डाॅक्टर) या डाॅक्टरांच्या संघटनेनेही अशा घटनांविरोधात अनेकदा भूमिका घेतली आहे. तसंच, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला या प्रकरणी मागण्या केल्या आहेत.
या आहेत डॉक्टरांच्या मागण्या :
रुग्णांची वाढती संख्या पाहता वैद्यकीय कर्मचारी वाढवावेत. वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ व्हावी.
हाॅस्पिटलमध्ये आणि आवारात कुठेही प्रचंड अंधार असलेल्या जागा राहू नयेत. रात्रीच्या वेळेसही सर्वत्र पुरेसा प्रकाश असावा.
वाॅर्डबाहेर सुरक्षारक्षक 24 तास तैनात असावेत.
रुग्णासोबत जास्तीत जास्त दोन नातेवाईकांनाच परवानगी द्यावी. अधिकचा जमाव आल्यास सुरक्षारक्षक सोबत असावेत.
सर्वत्र सीसीटीव्ही असावेत आणि त्यांची व्यवस्थित देखभाल व्हावी.
महिला डाॅक्टरांसाठी रात्रीच्यावेळी कामाच्या ठिकाणी स्वतंत्र खोली असावी.
महिला डाॅक्टरांचा छळ केल्यास, वाईट शब्दप्रयोग आणि मारहाण केल्यास कठोर कारवाई व्हावी.