mumbai : इनोव्हा कारचा झाडाला धडकून झालेल्या अपघातात दोघांचा बळी गेल्याची घटना बुधवारी रात्री उशिराने कांजूरगाव परिसरात घडली. जुनेद सलीम कुरेशी (२६) आणि साहिल कुरेशी (१८) अशी मृतांची नावे असून दोघेही कसाईवाडा, कुर्ला येथील रहिवासी आहेत. या अपघातात सात जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर कांजूरगाव बस थांब्याजवळ ही घटना घडली. पूर्व द्रुतगती महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या इनोव्हा कारचा (क्रमांक एम. एच. ०२ ए. एल. ५१८५) २६ वर्षीय कारचालक जुनेद सलीम कुरेशी याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी मार्गावरील एका पिंपळाच्या झाडाला धडकली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. घटनेची वर्दी लागताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील नऊ जखमींना बाहेर काढले. यातील गंभीर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, अन्य जखमींना मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी चालक जुनेद कुरेशी आणि सहप्रवासी साहिल कुरेशी यांना डाॅक्टरांनी उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. अपघातातील गंभीर जखमी अयात आयान हाजीम कुरेशी (१८) याच्यावर फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अन्य सहा जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.