१३ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (14:58 IST)
Pic: Symbolic
नागपूर  – विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या ३ जिल्ह्यात १३ जणांचा बळी घेणाऱ्या सिटी वन वाघाला पकडण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. कारण या वाघाने एका मागोमाग एक असे नरबळी घेतले असल्याने जनतेमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण होते. तसेच वन विभागात संदर्भात प्रचंड रोष व्यक्त होत होता. त्यामुळे वनविभागाने ६१ ट्रॅप कॅमेरे लावत वाघाला पकडण्याची मोहीम आखली होती. यासाठी रात्रंदिवस पाच मचान यांच्या वापर करण्यात आले अखेर बेशुद्ध करीत वाघाला पकडल्यामुळे आता नागरिकांनी निःश्वास सोडला आहे.
 
वनविभागाला सतत हुलकावणी देणारा सीटी १ या नरभक्षक वाघाचे काही दिवस देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर आणि ऐकलपूरच्या जंगलात वास्तव्य होते. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरापासून या वाघाने गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज आणि भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील सुमारे १३ जणांचे बळी घेतले. या नरभक्षक वाघाला जणू काही मानवी रक्ताची चटक लागली होती. त्यामुळे जंगलात फिरणे आदिवासी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील मुश्किल झाले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची टिम दिवसरात्र काम करीत असूनही यश येत नव्हते.
 
अखेर नरभक्षक वाघाला बेशुध्द करून पकडण्यात वनविभागाला यश आले. त्यासाठी आठवडाभरापासून वनविभागाच्या दोन टीम त्याच्या शोधासाठी अंदाज घेत होत्या. दरम्यान, आज गुरुवार, दि. १३ रोजी सकाळी झालेल्या या कारवाईने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळलाआहे. वाघाच्या दहशतीमुळे आदिवासींनी जंगलात आणि शेतकऱ्यांनी शेताकडे जाणे बंद केले होते. तसेच हा नरभक्षक वाघ घरापर्यंत पोहोचू नयेत म्हणून आम्ही घरासमोर शेकोटी पेटवून रात्र काढत होतो, असे अनेक ग्रामस्थांनी सांगितले.
 
अनेक दिवसांपासून वनविभागाकडून या वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. विशेष म्हणजे या वाघाने देसाईगंज नजिक प्रक्षेत्रातील एका गाईवर दोन दिवसापूर्वी हल्ला करून तिला मारले होते. त्यामुळे तो त्या ठिकाणी पुन्हा येणार याची खात्री असल्याने विशेष चमूची त्याच्यावर पाळत होती. जवळच वाघासाठी शिकार म्हणून दुसरी एक गायही ठेवली होती. अखेर आज सिटी वन त्या सापळ्यात अडकला आणि टप्प्यात येताच शूटर टीमने त्याच्यावर डार्ट मारत म्हणजे बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले अशी माहिती वनसंरक्षक अधिकाऱ्याने दिली.
 
या वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ या नरभक्षी वाघामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक झाली असून गेल्या ३ महिन्यापासून ताडोब्यातील विशेष पथक या वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते, तसेच यामुळे शेतीची कामे ठप्प पडल्यामुळे नागरिक आंदोलनाच्या तयारीत होते. मात्र यापुढेही नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती