मुंबईच्या वांद्रे येथील एच/पश्चिम भागात ३६ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. कारण १५ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून ते १६ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत तानसा पूर्ण मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगमधील काम हाती घेण्यात येणार आहे. म्हणून कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे या विभागातील नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्यामार्फत माहीम खाडी येथील पश्चिम रेल्वे पुलाखालून जाणाऱ्या तानसा पूर्व मुख्य जलवाहिनीवर कॅपिंगचे काम १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ३६ तास संपूर्ण वांद्रे (पश्चिम) म्हणजेच एच/पश्चिम विभागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. म्हणून सदर परिसरातील नागरिकांनी अगोदरच आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन पालिका जल अभियंता खात्यातर्फे करण्यात आले आहे.
जल अभियंता खात्यामार्फत हाती घेण्यात येणारे काम समय मर्यादेत झाल्यावर वांद्रे (पश्चिम) विभागाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही पालिकेतर्फे करण्यात आली आहे.