उपनगरातील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय महायुती सरकारने नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या करी रोड आणि सँडहर्स्ट रोड, तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स, चर्नी रोड, मुंबई सेंट्रल आणि हार्बर रेल्वेमार्गावर असणार्या कॉटन ग्रीन, डॉकयार्ड आणि किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
केंद्र सरकारने यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर करी रोडचे लालबाग, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी, मरीन लाईन्सचे मुंबादेवी, चर्नी रोडचे गिरगाव, मुंबई सेंट्रलचे-नाना जगन्नाथ शंकर शेठ, कॉटन ग्रीनचे काळाचौकी, डॉकयार्डचे माझगाव, किंग्ज सर्कलचे तीर्थंकर पार्श्वनाथ असे नामांतर होणार आहे. पारतंत्र्यांच्या खुणा पुसून टाकण्यासाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावेदेखील बदलण्याच्या उद्देशाने हे नामांतर करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. ब्रिटिशकालीन नावे बदलून त्याजागी महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता टिकविणारी तसेच मराठी संस्कृतीचा वारसा जपणारी नावे रेल्वे स्थानकांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचे दावेही करण्यात आले.