शूज आणि शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये 20 कोटी रुपयांचे कोकेन लपवले! केनियाहून येणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

मंगळवार, 26 मार्च 2024 (12:20 IST)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विदेशी महिलेला 20 कोटी रुपयांच्या कोकेनसह अटक करण्यात आली आहे. महिलेच्या सामानात कोकेन सुबकपणे लपवले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सिएरा लिओनच्या एका महिलेला विमानतळावर 19.79 कोटी रुपयांच्या 1,979 ग्रॅम कोकेनसह अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
या अधिकाऱ्याने सांगितले की, केनियाची राजधानी नैरोबीहून रविवारी शहरात पोहोचलेल्या या महिला प्रवाशाला गुप्त माहितीच्या आधारे चौकशीसाठी थांबवण्यात आले. डीआरआय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान महिलेच्या शूज, मॉइश्चरायझरची बाटली, शॅम्पूची बाटली इत्यादी वस्तूंमध्ये कोकेन आढळून आले.
 
खरेतर तपासादरम्यान अधिकाऱ्यांना महिलेच्या सामानातील अनेक वस्तू जड आणि काही खूप कठीण असल्याचे आढळले. त्यांची तपासणी केली असता त्या वस्तूंमध्ये पांढरी पावडर लपवलेली आढळून आली. डीआरआयच्या पथकाने फील्ड किटमधून पावडरची चाचणी केली असता त्यात कोकेन असल्याची पुष्टी झाली.
 
डीआरआयने एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून महिलेला अटक केली आहे. तसेच 19.79 कोटी रुपयांचे 1,979 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तस्करीचे जाळे उघड करण्यासाठी अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 
उल्लेखनीय आहे की, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) गेल्या एका महिन्यात 3.25 कोटी रुपयांचे 16 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी 12 तस्करांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींना सहार गाव, नालासोपारा, सांताक्रूझ, कुर्ला, भायखळा आणि शहरातील इतर भागातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एमडी ड्रग, हेरॉईन, गांजा यासह विविध अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती