महाराष्ट्रातील पुणे शहरातील एका मोटारसायकल शोरूम आणि सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागल्याने सुमारे ६० दुचाकी जळून खाक झाल्या. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. आगीनंतर धुरामुळे शोरूममध्ये एक व्यक्ती अडकल्याचे त्यांनी सांगितले, ज्याला नंतर वाचवण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना सोमवारी संध्याकाळी ८.३० च्या सुमारास बँड गार्डन रोडवरील ताराबाग परिसरात घडली, जिथे टीव्हीएस शोरूम आणि सर्व्हिस सेंटर तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी पोहोचताच आम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये मोठी आग आणि अनेक वाहने जळताना दिसली. अधिकाऱ्याने सांगितले की, जळालेल्या सुमारे ६० वाहनांमध्ये अनेक पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दुचाकी होत्या, काही नवीन होत्या आणि काही दुरुस्तीसाठी आणल्या होत्या. आगीत इलेक्ट्रिकल वायरिंग, मशिनरी, बॅटरी, सुटे भाग, संगणक, फर्निचर आणि कागदपत्रे देखील जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.