आमची सखी 'भुलाबाई ' लहानपणीची आठवण.....

सौ. अनघा अमित कुलकर्णी तळेगांव दाभाडे

सोमवार, 22 सप्टेंबर 2025 (13:18 IST)
लहानपणीची आठवण , भाद्रपद पौर्णिमेला येणारी आमची भुलाबाई , आमची सखीच ! टिपऱ्या खेळायच्या , गाणी म्हणायची, फेर धरायचा आणि घरी जाताना खाऊ ओळखायचा आणि प्रत्येक घरी चमचा भरच मिळाला तरी पोटभर खायचा कारण जेवढ्या मैत्रीणी तेवढी घरं, जेवढी घरं तेवढा खाऊ. महिनाभर धमाल ........

भाद्रपद पौर्णिमेला येणारी  भुलाबाई म्हणजे महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांमध्ये साजरा केला जाणारा एक उत्सव आहे. हा उत्सव भुलाबाई आणि भुलोजी (शिव-पार्वतीचे स्वरूप) यांना वाहिलेला असून, भाद्रपद पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत मुली-स्त्रिया मिळून रांगोळ्या काढून, गाणी गाऊन, खेळ खेळून हा उत्सव साजरा करतात. 
 
गणपती बाप्पा घरी गेले की वेध लागायचे भुलाबाई चे, काही जणी तर गणपती बाप्पाच्या आरासीतील काही सजावटीच्या वस्तू मुद्दामहून बाहेर राहू देत , किंवा आरस लहानशीच असेल तर , एका बाजूलाच असेल तर तिथेच भुलाबाई मांडायच्या , तिच्यासाठी खास छोटा पाट त्यावर आसन आणि तिथे भुलाबाई. ह्या भुलाबाईला छानसा चमेली, मधुमालती किंवा अगदी बुचाच्या फुलांचा भरगच्च हार. मधुमालती आणि बुचाच्या फुलांच्या हाराला तर सुई दोरा पण लागत नसे. एक छोटासा दिवा किंवा पणती, आईला संक्रांत वाणाला लुटून आलेली एक हळदी कुंकवाची छोटी कोयरी असं सगळं साहित्य लागायचं. आणि हो महत्त्वाचं म्हणजे टिपऱ्या आणि खाऊचा छोटासा डब्बा किंवा डबी किंवा अगदी वाटीवर पक्की बसेल अशी झाकणी आणि वाटी. हो कारण खाऊ सिक्रेट असे. 
 ALSO READ: भुलाबाईची गाणी संपूर्ण Bhulabai Song Marathi
भुलाबाई ची मूर्ती दरवर्षी नवीन असेलच अस नाही , पण जेव्हा घेतली जायची तेव्हा तिचं पातळ, चोळी अगदी गडद रंगाची मुद्दामहून आम्ही निवडत असू, मग भुलोजीचं (भुलाबाईचा नवरा) धोतर, सदरा आणि फेटा पण आकर्षकच असावा असा हट्ट असे. त्यांच्या बाळाचे मात्र आम्ही गाण्यात अनेक लाड पुरवत असू पण कपडे वगैरेंच तसं  फार काही गणित नसायचं , कारण ते आपलं त्या दोघांच्या मध्ये बसलेलं छोटं बाळ आणि त्याचे कपडे पण फारसे दिसून यायचे नाही . 
 
पहिल्या दिवशी खाऊ म्हणजे खिरापत साखर- खोबऱ्याची असायची. पिठी साखर आणि किसलेलं सुकं खोबरं. आणि ती नैवेद्य दाखवून लगेच वाटायची ओळखायची नाही. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून ती लपवायची आणि सगळ्या मैत्रिणींना ओळखायला लावायची. मग ह्यात एक वेगळीच चुरस असायची बत्तासे, फुटाणे, शेंगदाणे खडखड वाजून चटकन ओळखू येऊ नये म्हणून ते रुमालात बांधायचे आणि मग डब्यात ठेवायचे.

किंवा न वाजणारा खाऊ असेल तर तो डब्यात डबा ठेऊन वाजवायचा म्हणजे खडखड वाजून सगळ्यांची दिशाभूल होई. आणि एक धमाल होती ती ' श्री बालाजिची सासु ' . म्हणजे श्रीखंड, बासुंदी ,  लाडू, जिलेबी, चिरोटे , साटोरी, सुधारस अशा सगळ्या पदार्थांची नावे एका कोडवर्ड मध्ये सांगायची म्हणजे विचारायची आणि खाऊ ओळखायचा प्रयत्न करायचा. खेळायला आठ दहा जणी असायच्या , प्रत्येक जण कितीतरी खाऊंची नावे घ्यायची आणि खाऊ ओळखला जायचा  पण ह्यातूनही खाऊ नाही ओळखला गेला तर मग मात्र त्या मुलीचा मान नक्कीच वाढायचा .
ALSO READ: भुलाबाईची आरती Gulabai Aarti Marathi
आणि मग ती " हरलात का?" असं वदवून घ्यायची आणि मगच खिरापती चा डबा उघडायचा. एकीच्या घरी झालं की दुसरीच्या म तिसरीच्या असं करत करत दोन अडीच तास धमाल असायची ..... भुलाबाईची मूर्ती म्हणजे सुबक सुंदर मूर्ती . गोल चेहऱ्याच्या नऊवारी नेसलेल्या भुलाबाई, त्यांच्या शेजारी सुंदर रंगीत धोतर, रंगीत सदरा आणि रंगीत तुरेदार फेटा घातलेले रुबाबदार भुलोजी, आणि ह्या दोघांच्या मध्ये झबलं घातलेलं गोंडस बाळ, हे तिघेही एका कोचावर बसलेले अशी काहीशी असे. भुलाबाई भुलोजी म्हणजे शंकर पार्वती आहेत असं मानलं जातं. 
भुलाबाईची गाणी  सगळ्यांची तोंडपाठ. गाणी पाच, सहा किंवा जास्त कडव्यांची असायची.

ह्या गाण्यात नातेसंबंधातील गमती जमती असत . भुलाबाईचं कौतुक , वर्णन असे. आणि हो ' आडावरच्या पाडावर धोबी धुणं धुतो ' ह्या गाण्यात भुलाबाई आणि भुलोजी आणि बळाच्या कपड्यांच्या रंगाचे वर्णन आम्ही करत असू.... आणि त्यासाठीच भुलाबाईचं पातळ चोळी गडद आकर्षक रंगाचीच असावी असा आमचा हट्ट असे.
 
एक गाण शक्यतो एका मैत्रिणी कडे म्हटल तर ते दुसरीकडे रिपीट नाही करायचं असा जणू नियमच होता , आणि गाणी पण भरपूर होती सगळी गाणी म्हटली गेली पाहिजे असं वाटायचं. ' सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेवा तू हार गुंफीला, विडा रंगीला गुलाबाचं फुल माझ्या भुलाबाई ला ' ह्या गाण्यात फुलांच नाव बदललं जायचं ते एकेकीने आळीपाळीने बदलायच, ह्यात मोठी चुरस असे सगळ्यात वेगळं नाव कोणाच , जीला कोणाला कृष्णकमळ , अनंत असं काही फुलांचं नाव सुचेल ती मात्र भाव खाऊन जायची.

एक गाणं होत, ' येथून दाणा पेरत जाऊ माळी याच्या दारी हळूच भुलाबाई पाय टाका जोडवी तुमची भारी ...' ह्यात त्यांच्या एकेका दागिन्याच वर्णन केलेलं असायचं , ह्यातही तसंच जिला कोणाला एखाद्या वेगळ्या दागिन्याचं नाव सुचेल म्हणजे मेखला,  वाकी ती भाव खाऊन जायची. 
 
अशी अनोखी धमाल तर होतीच पण मला वाटतं सहज , सुंदर सोप्प यमक असणाऱ्या ह्या गाण्यांमध्ये ताकद होती आमची शब्दसंपत्ती वाढवण्याची. आमच्या त्या वयापर्यंत असणाऱ्या ज्ञानाला आणखीनच समृद्ध करण्याची..... 
 
भुलाबाईची गाणी आमची शब्दसंपत्ती समृद्ध करणारी तर होतीच पण आमच्यातली कल्पकता वाढवणारीही होती. भुलाबाईची गाणी तितकीच गंमतशीर पण होती . 
कारल्याच्या झाडाची कहाणी म्हणजे ते कारल्याच बी पेरल्यापासून ते त्या कारल्याची भाजी बनवून ती भाऊजींची वाट बघत भाऊजींना पानात वाढेपर्यंत , ती सासुरवाशीण माहेरी जायची परवानगी मागत असे, पण अजूनही आम्हाला कळलं नाही की ती माहेरी गेली की नाही कारण गाण्याचा शेवट होताना ' कारल्याला फोडणी घातली झनझन , भाऊजी आले तनतन...... असा काहीसा शेवट होत असे. हे झनझन तनतन म्हणताना आम्ही टिपऱ्याही त्या तालात जोरजोरात आपटत असू. असच एक गाणं होतं रुसून माहेरी गेलेल्या सासूरवाशिणीचं मग ह्यात त्या सासूरवाशिणीचं म्हणणं काय आहे ते विचारून तिच्या मागण्या पुरवण्याचं आश्वासन दिलं जायचं , परंतु तिचा रुसवा काही निघत नसे.

सासरची प्रत्येक व्यक्ती ह्यावेळी आपापली प्रत्येक वस्तू देऊ करत म्हणजे सासुबाई म्हणत सोन्याच्या पाटल्या देते , किंवा ताकाचा डेरा देते, नणंद म्हणत असे मोत्याच्या बांगड्या देते किंवा भातुकली देते असं सगळे जण काहीना काही प्रस्ताव मांडत आणि ही सासूरवाशिण मात्र  ' सोन्याच्या पाटल्या नकोच मजला , मी नाही यायची सासूराला ' असं म्हणून परत रुसून बसे, मग गाण्याच्या शेवटी पतीदेव न्यायला येत आणि मंगळसूत्र देतो म्हणत आणि ' मंगळसूत्र हवेच मजला मी तर येते सासूराला ' असं म्हणत राणीसाहेब परत नांदायला जायला तयार होत.

ह्या गाण्यात फक्त पतीदेवांची ऑफर फिक्स असायची मात्र सासरच्या इतर मंडळींनी दिलेली ऑफर मात्र मुलींच्या इच्छेनुसार  बदलायची . जसे सासुबाई सोन्याच्या पाटल्या, मोत्याच्या कुड्या किंवा तोडे किंवा ताकाचा डेरा असं काहीही देऊ करत असत. अशी बरीच मजेदार गाणी होती जी मनाला खूप आनंद देऊन जात.

या दौsssरा या राणी रुसून बैसली कैसी सासुरवाssss शी सुन घरासी येई ना कैसी?
सासू गेली समजावयाला चला चला सुनबाई आपल्या घराला सोन्याच्या पाटल्या देते तुम्हाला !
सोन्याच्या पाटल्या नकोच मजला मी नाही यायची सासुराला !
या दौssरा या राणी रुसून........ 
 
सगळ्यात पहिलं म्हटलं जाणारं गाणं हे प्रत्येक मुलीकडे म्हटलं जायचंच.
पहिली ग भुलाबाई देव देव सांज सांजेला खंडोबा खेळ खेळी मंडोबा,  मंडोबाच्या दारीबाई अवसनिचं पाणी अवसनिच्या पाण्याला गंगेचे पाणी, गंगेच्या पाण्याने वेळीला भात , हनुमंत बाळाचे लांब लांब टोपे हातपाय गोरे भुलाबाईचे बाई बाई अवस्नी माथा पुढे गवसनी गवसनीच एकच पान दुरून भुलाबाईला नमस्कार

 एवढीशी गंगा झुळझुळ वाहे , तांब्या पितळी जाय ग जाई नाही जुई नाही , चिंचा खालची माळन बाई चिंचा तोडत जाय ग, पाच पान खाय गं, खाता खाता रंगली तळ्यात घागर बुडाली तळ्या तळ्या एकोला भुलाबाई म्हणते माहेरा, जाते तशी जाऊ द्या बोटभर तेल लावू द्या तांब्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लाऊ द्या जांभळ्या घोड्यावर बसू द्या , जांभळ्या घोड्याचे उलटे पाय आऊल पाऊल जळगाव, जळगावचे ठासे ठुसे दुरून भुलाबाईचे माहेर दिसे. आपे दूध तापे त्यावर पिवळी साय सखी भुला बाई साखळ्या लेऊन जाय ,कशी नेऊ दादा? घरी नंणदा जावा करतील माझा हेवा नणदा घरोंघरी ,हेवा परोपरी, नणदे चा बैल डोलतं येईल डोलत जाईल.
 
आणि मग ह्यापुढची वेगवेगळी गाणी, मागच्या भागात सांगितलेली , आणि वेड्याच्या बायकोचं गाण फार गंमतशीर वाटत असे.आणि खेळ संपताना भुलाबाईच्या बाळासाठी पाळणा नुसता म्हटला जात नसे तर दोनचार टिपऱ्या आडव्या आणि दोनचार उभ्या अशा एकमेकावर ठेवून त्याचा लाकडी पाळणा करत असू आणि त्यावर एका लहानशा बाहुलीला निजवून पाळणा म्हणत असू. 
 
निज निज हळकून बाळा, लागु देरे तुझा डोळा ...... 
आणि मग आमच आवडतं गाणं जे सगळ्यांच्या घरी म्हटलंच जायचं 
भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चला हो माझ्या माहेराला जाता बरोबर पाट बसायला ताट जेवायला विनंती करते यशोदेला टिपऱ्या खेळू गाणे गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ. 
 
आणि ह्या गाण्यानंतर खाऊ ओळखण्याचा सोहळा व्हायचा आणि पुढच्या घरी जायचो. कोजागिरी पौर्णिमेला जिच्या घराला गच्ची आहे किंवा जिचं अंगण मोठ आहे तिथे कोजागिरीचा कार्यक्रम साजरा व्हायचा. तीन चार घर मिळून किंवा मुली मुली मिळून मस्त नियोजन करायच्या. यात प्रत्येकीने आपापला थोडा थोडा खाऊ आणायचा आणि भुलाबाई समोर छोट्या छोट्या वाट्यांमधून किंवा द्रोणा मधून तो मांडायचा साधारण  30 - 33 खाऊ मांडले जायचे . आणि मुख्य आकर्षण असायचं ते भेळीच. आणि कोजागिरीला आटवलेल्या दुधाचं.

मग संध्याकाळी सगळ्या जमायच्या भुलाबाईची छान सजावट करून तिला गच्चीत चांदण्यात बसवायच्या तिच्यापुढे नुकतेच पोळ्याला आलेले बैल मांडायच्या छोट्या छोट्या गाड्या छोट्या छोट्या बाहुल्या असे सगळी आरास केली जायची, त्यापुढे ते छोट्या छोट्या खाऊंच मोठं ताट ठेवलं जायचं आणि मग भुलाबाईची गाणी झाली फेर धरून झाला, फुगड्या खेळून झाल्या, छोट्या छोट्या नाटुकल्या , छोटी छोटी गाणी हे सगळे म्हणून त्याचे कार्यक्रम झाले की मग साधारण रात्री नऊ-दहाला भेळ खाण्याचा कार्यक्रम व्हायचा .आणि मग त्यानंतर पुन्हा थोड्या वेळ गप्पा गोष्टी गाणी दंगामस्ती हे सगळं झाल्यानंतर रात्री बारा वाजता चंद्र माथ्यावर आला की भूलाबाईला आणि चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून सगळ्याजणी दूध घेऊन आपापल्या घरी जात असू.  त्यानंतर माहेरी आलेल्या भुलाबाई पुन्हा आपल्या सासरी जात. 
 
मग पुढे पुढे निदान पहिल्या दिवशी आणि कोजागिरीला टिपऱ्या खेळल्या जाऊ लागल्या. कारण बदलणाऱ्या जीवन मानानुसार शाळांच्या वेळा, कुटुंब व्यवस्था , कार्य बाहुल्य. नंतर नंतर तर कोजागिरी फक्त सेलिब्रेशन पुरतीच राहिली. आणि तीही वीकेंड्स बघूनच साजरी केली जाऊ लागली. पण चला तेवढी तरी का होईना गाठभेट तरी होते म्हणून सगळ्या प्रकारच्या कोजागिरीला मान्यता मिळाली. 
 
 तरीही काहीजण अजूनही संस्कृती जपताना दिसतात. काही ठिकाणी अजूनही टिपऱ्यांचा ताल, चिमुकल्या मुलींचा चिवचिवाट आणि खाऊ च्या डब्याचा खडखडाट ऐकू येतो. आणि मन बालपणात हरवून जातं, मनात जपलेल्या त्या भुलाबाई ला शोधायला.....!!
(सौ. अनघा अमित कुलकर्णी तळेगांव दाभाडे)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती