मुंबई महापालिकेने आतापर्यंत चार सीरो सर्वेक्षण केले असून त्याला अभूतपूर्व यश मिळाले आहे. ही बाब पाहता मुंबई महापालिकेने आता पाचव्या सीरो सर्वेक्षणाला गुरुवारपासून सुरुवात केली आहे. यामध्ये ८ हजार नमुने संकलित करुन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाचा माग शोधण्यासाठी सीरो सर्वेक्षण (रक्त नमुने संकलन करुन सर्वेक्षण) महत्त्वाचे ठरत आले आहे. उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय वस्ती, झोपडपट्टी, सोसायटी आदी परिसरातील रहिवाशांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंड तयार झाल्या, हे तपासण्यासाठी सीरो सर्वेक्षण केले जाते. आयडीएफसी आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने पहिले आणि दुसरे सीरो सर्वेक्षण जुलै व ऑगस्ट २०२० मध्ये तीन प्रशासकीय विभागांमध्ये केले. तिसरे सीरो सर्वेक्षण मार्च २०२१ मध्ये केले. चौथे सर्वेक्षण लहान मुलांकरिता मे आणि जून २०२१ या कालावधीमध्ये सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले.मुंबई महापालिकेने आतापर्यंत चार वेळा यशस्वी सीरो सर्वेक्षण केले. आता पाचवे सीरो सर्वेक्षण गुरुवार,१२ ऑगस्टपासून हाती घेण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व २४ विभागातील महानगरपालिका दवाखान्यांमार्फत पाचवे सीरो सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये निवडक वैद्यकीय व्यावसयिकांद्वारे (जनरल प्रॅक्टीशनर्स) त्यांच्या दवाखान्यात सर्वेक्षणाबाबतची कार्यवाही करण्यात येईल.या सर्वेक्षणात ८ हजार नमुने घेण्यात येणार असून त्यांची चाचणी पालिकेच्या सायन रुग्णालयात करण्यात येणार आहे.