भांडूपच्या सनराईज रुग्णालय आगीची चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

शनिवार, 27 मार्च 2021 (14:52 IST)
मुंबईच्या भांडूप भागातील ड्रिम्स मॅाल सनराईज रुग्णालयाला शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर मुंबई पोलिसांनी त्यासाठीची FIR दाखल केली आहे. तर या आगीची चौकशी करण्यात येणार असल्याचं मुंबई महापालिकेने जाहीर केलंय.
 
मुंबई आपत्कालिन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातून 76 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत होते.
 
या दुर्घटनेत तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी 9 जण कोरोना पेशंट होते आणि त्यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचं मुंबई महापालिकेने म्हटलंय.
 
या प्रकरणाची चौकशी करून 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
 
आपत्कालीन विभागाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, सनराईज रुग्णालयातील 30 कोरोना रुग्णांना पालिकेच्या जंबो रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर इतर 30 रुग्णांना फोर्टिस रुग्णालय पाठव्यात आलं आहे. इतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आग लागण्यामागचं ठोस कारण समजू शकलेलं नाही.
 
ही आग विझवण्यासाठी 22 आगीचे बंब पाठवण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी याविषयीची FIR दाखल केल्याचं ANI वृत्तसंस्थेने म्हटलंय.
 
 
मृतांची नावे -
या घटनेत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला. यापैकी निसार जावेदचंद (वय 74), मुणगेकर (वय 66), गोविंदलाल दास (वय 80), मंजुळा बाथेरिया (वय 65), अंबाजी पाटील (वय 65), सुनंदा पाटील (वय 58) आणि सुधीर लाड (वय 66) या 7 जणांची ओळख पटली असून इतर 3 जणांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती