मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे ५ लाखांची नुकसान भरपाई

शुक्रवार, 26 मार्च 2021 (16:47 IST)
मुंबईतील भांडुपमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या आगीच्या घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. ज्या रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. वेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागला, आणि त्यात काही रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे ५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री ठाकरेंनी दिली आहे. 
 
अशा दुर्घटना घडू नये, म्हणून याआधीच सूचना देण्यात आलेल्या आहेत, की जिथे जिथे आरोग्य व्यवस्था उभारण्यात आलेली आहे, तिथले स्ट्रक्चरल ऑडीट करा. त्यामुळे अशा घटना का घडतायत, याबाबत पुन्हा चाचपणी केली जाईल. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल, आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 
 
मुंबईतील भांडुपच्या ड्रीम्स मॉलमध्ये आग लागलेली. यात तिसऱ्या मजल्यावरील सनराईज रुग्णालय देखील आगीच्या विळख्यात आले. या आगीत गुदमरून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६९ रुग्णांची सुटका करण्यात यश आलेले आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेनेही आगीच्या घटनेबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती