मनसुख हिरेन यांच्या हत्येची केस राज्य सरकारला स्वत:कडे का ठेवायची होती? तर याचं सरळ उत्तर आहे, की मनसुख हिरेन यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये मोठं षडयंत्र आहे. राज्य सरकार, राज्य सरकारमधील नेते यांच्या निर्देशानुसार मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची दिशा भरकटवण्यात आली. हा राज्य सरकारचा हेतू होता, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी हे आरोप पत्रकार परिषदे घेत केले.
मनसुख हिरेन यांचा जेव्हा मृतदेह आढळला. त्यावेळी मृत व्यक्तीच्या शरीरावर रुमाल मिळाले हे सर्वांनी पाहिले. मात्र, मनसुख हिरेन यांचं जेव्हा शवविच्छेदन करण्यात आलं, तेव्हा त्या अहवालात रुमालांचा उल्लेख नाही आहे. रुमालांचा अहवालात उल्लेख का नाही? असा सवाल शेलार यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानुसार शवविच्छेदन करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं लागतं. परंतु हिरेन यांचा शवविच्छेदन करताना पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग न करता एक-एक मिनिटांचा व्हिडिओ करण्यात आला आहे. हिरेन यांचा शवविच्छेदन दोन तास करण्यात आलं. यावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानुसार शवविच्छेदनाचं रेकॉर्डिंग दोन तासांच व्हायला हवं होतं. पण प्रत्यक्षामध्ये एक-एक मिनिटाचे ७-८ व्हिडिओ करण्यात आले, असं शेलार यांनी सांगितलं.