लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? त्याबद्दल चिंता कधी करायला हवी? वाचा

शनिवार, 15 जून 2024 (20:35 IST)
लघवीचा रंग लाल, पिवळा, गुलाबी, हिरवा, जांभळा, केशरी, निळा म्हणजेच इंद्रधनुष्यातील वेगवेगळ्या रंगांप्रमाणे असू शकतो, असं तुम्हाला सांगितलं तर, विश्वास बसणार नाही, पण हे खरंय!आपलं शरीर लघवीद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थ किंवा शरीरातील घाण बाहेर काढत असतं.
 
त्यात शरीरातील प्रथिने, स्नायू आणि लाल रक्तपेशींच्या विघटनाने तयार होणाऱ्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांचा समावेश असतो. याशिवाय इतरही अनेक गोष्टी लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतात. जीवनसत्त्व आणि आपण खातो ती औषधंही .
पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लघवीमध्ये असता कामा नयेत. आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात तो म्हणजे "तुमच्या लघवीचा रंग कसा आहे?"
 
या प्रश्नाचं उत्तर ऐकून डॉक्टर रुग्णाचा रोग जाणून घेऊन पुढील उपचार करतात.
 
लाल रंग
लघवीचा रंग लाल असेल तर याचा अर्थ लघवीतून रक्त जात आहे.
 
शरीरातील मूत्रसंस्थेशी संबंधित समस्येमुळे असं होऊ शकतं.
 
मूत्रपिंड, मूत्राशय आणि प्रोस्टेट आणि मूत्रमार्गाशी जोडलेल्या कोणत्याही भागात रक्तस्त्राव होत असल्यास लघवी लाल रंगाची होते.
 
लघवीतून येणारे रक्त कशामुळं येतं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, त्याचं प्रमाण किती आहे. एखादी व्यक्ती लघवीला जाते तेव्हा ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रंगाचे असू शकते.
 
रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असेल तर लघवीचा रंग इतका गडद असू शकतो, की तो लाल वाइनच्या रंगाशी मिळता जुळता असेल.
 
या रक्तस्त्रावाची अनेक कारणं असू शकतात – जसं मुतखडा, कर्करोग, मूत्रमार्गातील संसर्ग.
 
बीट जास्त खाल्ल्यानेही लघवीचा रंग लाल होऊ शकतो.
 
केशरी आणि पिवळा
आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हा आपली लघवी पिवळ्या रंगाच्या अनेक छटांमध्ये असते. शिवाय आपण पाणी किती पितो यावर देखील अवलंबून असते.
 
पाण्याच्या कमतरतेमुळे, लघवीचा रंग गडद पिवळा होतो आणि कधीकधी तो केशरी असतो.
 
जर तुम्ही पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचं सेवन करत असाल तर लघवीचा रंग फिकट पिवळा होईल.
 
लघवी पिवळी होण्यास कारणीभूत असतं आपल्या शरीरातील युरोबिलिन म्हणतात.
 
त्याच्या निर्मितीची प्रक्रिया शरीरातील जुन्या लाल रक्तपेशींच्या विघटनाने सुरू होते.
 
काही रक्तपेशी टाकाऊ झाल्या की त्यांना शरीरातून बाहेर काढणं आवश्यक असतं.
 
अशावेळी शरीरात एक प्रक्रिया होते. या प्रक्रियेत एक संयुग तयार होतं ज्याला बिलीरुबिन म्हणतात. ते काही प्रमाणात लघवीद्वारे आणि काही प्रमाणात आतड्यांद्वारे शरीरातून बाहेर पडते.
 
आपले यकृत हे बिलीरुबिन पित्त तयार करण्यासाठी वापरते.
 
शरीरातील चरबीचे पचन आणि विघटन यासाठी हे पित्त महत्त्वाचे असते.
 
पित्त आतड्यात राहून मलमार्गे बाहेर पडते. या पित्तामुळेच विष्ठेला तपकिरी रंग प्राप्त होतो.
 
जेव्हा पित्त आतड्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, कदाचित पित्ताशयातील खडे किंवा कर्करोगामुळे पित्त नलिका अवरोधित होतात, तेव्हा बिलीरुबिन रक्तवाहिन्यांमध्ये परत जाते आणि मूत्रमार्गे उत्सर्जित होते.
 
यामुळे लघवीचा रंग गडद होऊ लागतो - केशरी किंवा तपकिरी.
 
बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यास त्वचेचा रंगही पिवळा होऊ लागतो.
 
शरीराच्या या अवस्थेला 'ऑब्स्ट्रक्टिव्ह जाँडिस' म्हणजेच एक प्रकारची कावीळ म्हणतात.
 
प्रतिजैविक रिफॅम्पिसिन किंवा काही औषधांमुळे देखील लघवी केशरी होऊ शकते.
 
हिरवा आणि निळा
हिरव्या आणि निळ्या लघवीची प्रकरणे फार दुर्मिळ आहेत. जर तुम्ही टॉयलेटमध्ये खाली बघितले आणि लघवीचा रंग हिरवा किंवा निळा दिसत असेल तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
 
जर टॉयलेट पॉटमधील एखाद्या गोष्टीमुळे लघवीचा रंग बदलत नसेल, तर तुमच्या शरीरात हिरवी किंवा निळी लघवी निर्माण होण्याची काहीतरी कारणं असू शकतात.
 
काही खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी हिरवा किंवा निळा रंग वापरला गेला असेल, तर लघवीचा रंग हिरवा किंवा निळा होऊ शकतो.
 
परंतु या पदार्थांचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं तरच असं होऊ शकतं.
ऍनेस्थेटिक्स, जीवनसत्त्वे, अँटीहिस्टामाइन्स यांसारख्या काही औषधांच्या सेवनामुळेही लघवीचा रंग हिरवा किंवा निळा होऊ शकतो.
 
एक मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की, काही जीवाणू देखील अशी संयुगे तयार करतात ज्यांचा रंग हिरवट असतो.
 
स्यूडोमोनास एरुगिनोसा हा जीवाणू निळ्या-हिरा रंगाचा पायोसायनिन पदार्थ तयार करतो.
 
युरिन इन्फेक्शन मध्ये अशी दुर्मिळ स्थिती असते. अशा परिस्थितीत, लघवी करताना जळजळ आणि वेदना सहन कराव्या लागतात.
 
जांभळा रंग
लघवी जांभळ्या रंगाची होणं फार दुर्मिळ आहे. याचे एक संभाव्य कारण म्हणजे पोर्फेरिया.
 
हा एक अनुवांशिक रोग आहे जो त्वचा आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो.
 
याचं दुसरं कारण म्हणजे पर्पल युरिन बॅग सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार जो मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होतो.
 
ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कॅथेटर (शरीरातून लघवी काढून टाकण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या वापरले जाणारे उपकरण) असलेल्या रुग्णाच्या आत असलेले बॅक्टेरिया लघवी जांभळी करतात.
 
जांभळा किंवा गुलाबी
आपण पुन्हा एकदा रक्त आणि बीट या गोष्टींकडे परत येऊ.
 
थोड्या प्रमाणात बीटचे सेवन केल्याने लघवीचा रंग गडद लाल ऐवजी गुलाबी होऊ शकतो.
 
जेव्हा हे घडतं तेव्हा डॉक्टर लघवीची तुलना रोज वाइनशी करतात.
 
इतर रंग
लघवीचा रंग कधी गडद असतो तर कधी फिकट. सहसा तपकिरी किंवा पिवळसर छटा असलेला असतो. जेव्हा असं होतं तेव्हा, डॉक्टर त्याची तुलना कोका-कोलाशी करू शकतात.
 
काहीवेळा स्नायू विघटित होऊन मायोग्लोबिन नावाच्या संयुगात रूपांतरित झाल्यामुळे असं घडतं. हे रॅबडोमायोलिसिस नावाच्या गंभीर आजारामुळे होऊ शकतं. किंवा अतिश्रम आणि काही औषधांच्या वापरामुळे होऊ शकतं.
हे बिलीरुबिनमुळे देखील होऊ शकतं. बिलीरुबिनमुळे लघवी इतकी गडद होतो की ती केशरी ऐवजी तपकिरी दिसते. पण हे रक्तामुळेही होऊ शकतं.
 
मूत्रपिंडाची जळजळ (याला ग्लोमेरुलोनेफ्राइटिस म्हणतात) झाल्यावर रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. त्यामुळे मूत्रमार्गातून जाताना लघवी लाल ते तपकिरी रंगात बदलते.
 
आणि शेवटी, रंगहीन लघवी देखील असते. लघवीचा रंग गडद पिवळा नसावा. रंगहीन लघवी देखील इतर आजारांचं लक्षण असू शकते. जसं की मधुमेहामुळे असो किंवा अति मद्यपानामुळे लघवी रंगहीन होते.
 
यावरून हेच समजू शकतं की लघवीचे वेगवेगळे रंग असू शकतात.
 
परंतु लघवीचा रंग बदलत असेल तर पाणी जास्त प्यायचं की डॉक्टरकडे जायचं हे तुम्हीच ठरवू शकता.
 
Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती