ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनी जेवल्यावर थोडं चाललं पाहिजे, वाचा 5 कारणं

शुक्रवार, 14 जून 2024 (21:32 IST)
जेवणानंतर 'शतपावली' करावी असं घरातले मोठे-जाणते कायम सांगत असतात. अगदी काही मिनिटांत ही शतपावली होऊ शकते. पण 'शतपावली' किंवा फक्त दोन मिनिटांच्या वॉकचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात.
 
जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीनच्या संशोधनातून हे फायदे समोर आले आहेत. पण जेवणानंतर संथपणे चालावं जोरात चालू नये असं तज्ज्ञ सांगतात.
 
ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांनी तर आवर्जून शतपावली करावी. त्यामुळं जेवण झालं असेल तर शतपावली करता-करता हे फायदे नक्की वाचा.
रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यासाठी - संशोधनानुसार जेवल्यानंतर संथ गतीने चालल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित राहण्यासाठी फायदा होतो. जेवणानंतर 60 ते 90 मिनिटांच्या आत हा वॉक किंवा शतपावली करावी असं संशोधक सांगतात. टाईप-2 डायबिटीज असणाऱ्यांनी तर 10-15 मिनिटं चालावं, असं सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या मते, 100 पावलं किंवा 10 मिनिटं चालल्यामुळे अतिरिक्त साखर स्नायू आणि यकृतातून शरीर खेचून घेते.
 
पचनक्रिया सुधारते - जेवणानंतर चालल्याने पोट रिकामं होण्याचं प्रमाण जलग गतीनं होतं. खाल्लेलं जेवण लवकर पचायला मदत होते. तसंच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, बद्धकोष्ठता, पोट फुगणे असे त्रास असलेल्यांना काही वेळ चालल्यामुळं खूप मदत होते.
 
जेवून लगेच झोपल्यामुळे यकृतात चरबीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. चालल्यानं आपण याला प्रतिबंध करू शकतो.
हृदयाचं आरोग्य - चालणं हा हृदयासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चालताना सोलेस (Soleus) स्नायू सक्रिय होतात. त्यांना पेरिफेरिअल हार्ट मसल्स म्हटलं जातं.
 
हे स्नायू शरीरातील इतर भागांतून हृदयाकडं रक्त पाठवतात. त्यानं रक्ताभिसरण सुधारतं. पण हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी जेवणानंतर जास्त व्यायाम करू नये, असंही तज्ज्ञ सांगतात.
 
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी - चालल्यामुळे अॅड्रिनलिन आणि कॉर्टिसॉलसारख्या स्ट्रेस हार्मोन्सची शरीरातील मात्रा कमी होते. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास खूप मदत होते, असं तज्ज्ञ सांगतात. जेवणानंतर संथ चालल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.
 
चालण्यामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते आणि सामाजिक पातळीवरही त्याचे फायदे होतात. डिप्रेशन असेल तर चालणं हे अँटी डिप्रेसंट म्हणून काम करतं.
 
स्नायू बळकट होतात- चालण्याने स्नायू बळकट होतात. विशेषत: पाय, बोटं, कंबर, यामुळे शरीराचं संतुलन चांगलं राहतं.
 
चालण्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता निर्माण होते. चालण्यामुळे शरीराचा आकार चांगला राहतो

Published By- Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती