प्रदूषित हवेमुळे सर्दी, खोकला वाढतोय? याचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होत आहेत?

-प्राची कुलकर्णी
सध्या कुठेही गेलं की सर्दी खोकल्याने बेजार असणारी अनेक लोकं तुम्हांला दिसतील. या सर्दी खोकल्याला जसं व्हायरल इन्फेक्शन कारणीभूत ठरतं आहे तसेच आणखी एक कारण यामागे आहे.
 
ते कारण म्हणजे देशात आणि राज्यात सध्या महत्वाचा ठरलेला आणि अनेकांना सतावणारा प्रश्न असणाऱ्या प्रदुषणाचे.
 
दिल्लीतले प्रदूषण तर आपल्यासाठी नवे राहिले नाही. पण यंदा महाराष्ट्रातल्या मुंबईच्या बरोबरीनेच पुण्याचीही हवा प्रचंड खराब झाली आहे.
 
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॅापिकल मेट्रॅालॅाजीच्या 6 नोव्हेंबरच्या आकडेवारी नुसार दिल्लीतल्या हवेत पीएम 10 कणांचे प्रमाण आहे 249 इतकं तर पीएम 2.5 कणांचं प्रमाण आहे 249 इतकं.
 
मुंबईमध्ये तुलनेने बरी परिस्थिती आहे. कारण इथं पीएम 10 कणांचं प्रमाण 155 तर पीएम 2.5 चं प्रमाण 74 इतकं आहे. तर पुण्यात पीएम 10 123 आणि पीएम 2.5 77 आहे.
 
वायू प्रदूषण म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या व्याखेनुसार वातावरणात नैसर्गिक हवेत जेव्हा कोणतेही रासायनिक, जैविक किंवा भौतिक रेणूंचा समावेश होतो आणि त्यामुळे वातावरणात, हवेत बदल होतात तेव्हा त्याला प्रदूषण म्हणले जाते.
 
हे प्रदूषण मोजलं जातं ते या पीएम कणांमुळे.
 
पीएम म्हणजे पार्टिकल्स इन मायक्रोग्रॅम पर क्युबिक मिटर. म्हणजे एका क्युबीक मीटर मध्ये 10 मायक्रॅान आणि 2.5 मायक्रॅान व्यासाचे कण ( मायक्रोस्कोपीक पार्टिकल्स )किती प्रमाणात आहेत यावरुन प्रदुषणाची पातळी ठरते.
 
हेच पीएम पार्टिकल्स जर श्वसनावाटे आपल्या शरिरात गेले तर आपल्या आरोग्यावर दुरगामी परिणाम घडवतात.
 
प्रदुषणाची कारणे काय? ते शरीरासाठी हानिकारक का ठरते?
याबाबात आयआयटीएमचे शास्त्रतज्ञ बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "ट्रॅफिक, घरातील धूर, कारखान्यांमधला धूर अशा अनेक कारणांनी हवेचे प्रदूषण होते. त्यात हवामानाच्या परिस्थितीची भर पडते. हवेचा वेग जास्त असेल तर पीएम कणांचे प्रमाण जास्त असले तरी प्रदूषण पातळीमध्ये फार फरक पडत नाही.
 
दुसरीकडे हवेचा वेग कमी झाल्यास मात्र या कणांचं कॅान्सन्ट्रेशन वाढून हवा खराब होते, प्रदूषित होते. हे पीएम कण म्हणजे फक्त धुळीचे कण नसतात. तर त्यात सल्फेट, नायट्रेट असे केमिकल्स देखील असतात. ते फुफ्फुसात गेल्याने श्वसनाला त्रास होतो. तर कार्बन मोनॉक्साईड रक्तात मिसळले जाते."
 
"त्याचे प्रमाण कमी जास्त झाले तर बॉडी फंक्शनवर त्याचा परिणाम होतो. नव्या अभ्यासानुसार याचा परिणाम नवजात बालकांवर आणि गरोदर मातांवर देखील होत असल्याचं निदर्शनास आलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
 
पण यामागची कारणे काय आहेत याबाबत बोलताना शास्त्रज्ञ सांगतात की, प्रत्येक शहरात वेगवेगळी कारणं आहेत. दिल्लीत बायोमासमुळे प्रदूषण जास्त आहे. मुंबईत वाहतुक कोंडी आणि बांधकाम ही प्रमुख कारणे आहेत.
 
पुण्यात इंडस्ट्री, बांधकाम आणि वाहनांचे प्रदूषण ही प्रमुख कारणे प्रदुषणाला कारणीभूत ठरत आहेत.
 
यामुळेच एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवा गुणवत्ता निर्देशांक कसा आहे हे दाखवणाऱ्या कोणत्याही आकडेवारीवर नजर टाकली तर आपल्याला दर्जा कसा आहे याचा अंदाज येतो. हवेचा दर्जा जर खराब असेल तर बाहेर व्यायाम करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
 
तसेच अगदी सकाळी आणि संध्याकाळी उशीरा बाहेर पडणे टाळावे असे आरोग्य संघटना सांगते. याबरोबरच व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छता करण्याचा ऐवजी ओल्या फडक्याने धूळ पुसावी असा सल्ला आरोग्य संघटना देते. तसेच अति थकवणारी कामे न करण्याचा देखील सल्ला दिला जातो.
 
तर जिथे तुलनेने बरी परिस्थिती आहे तिथे ही नियमावली थोडी शिथील होत असली तरी एकूण आरोग्यावर परिणाम होणं मात्र थांबत नाही.
 
हे प्रदूषण आरोग्यासाठी किती हानिकारक?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर परिक्षित प्रयाग बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "हवेच्या प्रदुषणामध्ये अनेक लेयर्स असतात. यात गॅसेस असतात तसेच पार्टिकल्स असतात.
 
प्रदुषणामुळे खूप काही होऊ शकतं. सर्दी खोकला या गोष्टी होऊ शकतात लोकांना. त्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. पार्टिक्युलेट पोल्युटंट्स आहेत त्याच्यामुळे ज्या लोकांना आधीपासून दम्याचा त्रास आहे किंवा लंग्जचा आजार आहेत त्यांना यामुळे इतर सिम्प्टम्स होऊ शकतात.
 
हृदयाचे आजार होऊ शकतात. प्रदूषण जर तीव्र असेल तर मेंदूवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हवेचे प्रदूषण गांभीर्याने घेतले पाहिजे.”
 
एअर प्युरिफायर किंवा मास्क वापरल्याने दुष्परिणाम कमी?
अनेक शहरांमध्ये जसं हवेची पातळी खराब होत जाते तसं काय काळजी घ्यावी याची यादी जाहीर करताना सरकारी संस्थांकडून मास्क वापरायचा सल्ला दिला जातो. तसंच अनेक लोक एअर प्युरिफायर्स देखील बसवण्याचा पर्याय स्वीकारतात.
 
पण हे दोन्ही खरंच परिणामकारक ठरतात का याबाबत डॅा प्रयाग सांगतात, "हे तात्पुरते उपाय आहेत.ते मुळापर्यंत पोहोचत नाहीत. मास्कचा फायदा होऊ शकतो पण तो उपाय तात्पुरता आहे. मास्क कोणत्या प्रकारचा आहे, त्यामुळे कोणते धुळीकण अडवले जाऊ शकतात ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे मास्क मुळे गॅसेस अडवले जाऊ शकत नाहीत."
 
ते पुढे सांगतात, "जे धोकादायक गॅसेस आहेत ते यामुळे अडवले जात नाहीत. ते आपल्या श्वसनात जाणार आहेतच. तसंच लोकांना मास्क घालायला सांगितले तरी सगळे जण घालणार नाहीत आणि कायम मास्क घालणं हा देखील पर्याय असु शकत नाही.”
 
मग उपाय काय यावर डॉक्टर प्रयाग सांगतात , "जे वयस्कर आहेत किंवा ज्यांना फुफ्फुसाचे विकार आहेत किंवा हृदयाचा विकार आहे त्यांच्यासाठी प्रदूषण हे जास्त हानीकारक ठरतं. त्यामुळे अशा वेळेस सरकारी एजन्सी आहेत ज्यातून ही आकडेवारी पोहोचवली जाते.
 
त्यामुळे ही गुणवत्ता किती आहे ते तपासून त्याप्रमाणे दिवस आणि एक्सपोजर्स प्लॅन करणे गरजेचे आहे. गर्दीच्या किंवा प्रदुषित माणसांना अशा ठिकाणी न नेणे हा उपाय महत्वाचा आहे.”
 
लहान मुलांसाठी प्रदुषण किती धोकादायक?
लहान मुलांमध्ये बाळ दमा किंवा इतर सर्दी खोकल्यासारखे आजार होण्याचे देखील प्रमाण वाढले असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यातच जी बाळं प्रीमॅच्युअर आहेत अशांना याचा जास्त त्रास होत असल्याचं डॅाक्टर सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना नोबल रुग्णालयाच्या नीओनेटोलॅाजी विभागाचे डॅाक्टर अभय महिंद्रे म्हणाले, "प्रदूषण वाढल्याने नवजात बालकांना अलर्जीचा त्रास होतो. तर प्रीमॅच्युअर बाळांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढते कारण त्यांचं फुफ्फुस पूर्णपणे विकसित होत नाही. अशा मुलांना त्रास वाढून उपचारांची, काही वेळा रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज भासू शकते.
 
तसंच सर्वसाधारणपणे मुलांमध्ये सध्या प्रदूषण वाढल्यामुळे मुलांमध्ये हायपर रिअॅक्टिव्ह एअरवे डिसिजचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्या परिस्थिती मध्ये प्रिवेंशन हे सगळ्यात उत्तम पर्याय. म्हणजे शक्यतो दिवाळीत मुलांसाठी धूर न होणारे फटाके वापरावेत. तसेच जर मुलांना बाहेर नेणार असाल तर त्यांना धूर नाकात जाणार नाही अशा अंतरावर ठेवा. नवजात ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी मास्क वापरणे योग्य नाही. त्यापुढच्या मुलांमध्ये मास्क वापरला जाऊ शकतो.
 
फटाके वाजत असतील धूर असेल अशावेळी शक्यतो मुलांना घरात थांबवणे योग्य. तसंच प्रदुषणाच्या बाबत शिल्डचा देखील उपयोग होत नाही. त्यामुळे मुलांना प्रदुषणात घेऊन जाताना काळजीपूर्वक विचार करुन नियोजन करणं गरजेचं आहे."
 
तर पुना हॅास्पिटलचे कन्सल्टंट पल्मनॅालॅाजिस्ट डॉक्टर नितीन अभ्यंकर म्हणाले, "आपल्या भागात वातावरण किती खराब आहे आणि प्रदुषण किती प्रमाणात आहे याचा विचार सर्वात आधी करायला हवा. उदाहरणार्थ दिल्ली इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रातल्या शहरात नाहीये. एअर क्वालिटी धोकादायक पातळीवर असेल तर घराबाहेर पडणे टाळणे योग्य. प्रत्येक शहराच्या परिस्थिती प्रमाणे नियमावली हवी. म्हणजे प्रदुषण पातळी 300 च्या आसपास असेल तर मास्क वापरणं बंधनकारक असणे योग्य.
 
प्रदुषण असताना पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी पीएम 2.5 कणांचे प्रमाण वाढलेलं असते. त्यावेळी व्यायामाला जाणं टाळावं. थोडं उन आलं की व्यायामासाठी बाहेर पडा. तसंच जर मास्क वापरणार असाल तर तो एन-95 मास्क वापरावा. त्याचा परिणाम नीट होतो. सणांना धूर न होणारे फटाके वापरावे. अति लहान मुलं आणि अति वयस्कर लोकांनी अशा वेळी बाहेर पडणं पूर्णपणे टाळणं योग्य. तसंच प्रवासाचे नियोजन असेल तर दिल्ली सारख्या शहरातून जाणे टाळा. शक्यतो समुद्रकिनारी प्रवास करण्याचे नियोजन करा. जिथे परिस्थिती बिकट नाही तिथे दैनंदिन कामं आहेत तशी सुरू ठेवायला हरकत नाही. पण ते करताना सकाळी लवकर किंवा रात्री उशीरा बाहेर पडणं टाळायला हवं."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती