कोव्हिड काळात पन्नाशी ओलांडलेल्या लोकांच्या मेंदूची शक्ती कमी झाली- डॉक्टरांचा निष्कर्ष

शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (17:52 IST)
नवीन अभ्यासानुसार, कोव्हिड साथीचा इंग्लंडमधील 50 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम झालेला असू शकतो.स्मृती आणि इतर विद्याशाखांमधील बदल मापण्यासाठी 3000 हून अधिक स्वयंसेवकांनी वार्षिक प्रश्नावली आणि ऑनलाइन संज्ञानात्मक चाचण्या पूर्ण केल्यानंतर साथीचा रोग हळूहळू उलगडत गेला.
 
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तणाव, एकटेपणा आणि दारूचे सेवन यामुळे काही गोष्टींचे निष्कर्ष स्पष्ट होऊ शकतात.
 
कोव्हिडची भीती, चिंता व अनिश्चितता आणि दिनचर्येमध्ये येणाऱ्या व्यत्ययांचा मेंदूच्या आरोग्यावर "वास्तविक, कायमस्वरूपी टिकणारा प्रभाव" असू शकतो, असं तज्ज्ञ म्हणतात.
 
अभ्यासात असंही आढळून आलंय की, साथीच्या पहिल्या वर्षात लॉकडाऊनच्या वेळी आकलनात्मक कामांमध्ये घट होण्याचा वेग वाढलेला.
 
दुसऱ्या वर्षातही स्मृतीची क्षमता कमी होणं चालूच राहिलं.
 
साथीचा आजार सुरू होण्याआधीच ज्या लोकांना स्मरणशक्तीशी संबंधित काही समस्या होत्या त्यांची परिस्थिती तर आणखीनच बिकट झाली.
 
‘द लॅन्सेट हेल्दी लाँगेविटी’मधे प्रकाशित झालेल्या ‘प्रोटेक्ट’ (PROTECT) नावाच्या अभ्यासाअंतर्गत निरोगी मेंदूचे वय किती आहे आणि काही लोकांना स्मृतिभ्रंश का होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला.
 
यामध्ये स्मृतीकौशल्ये आणि तर्क तपासण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण देण्याच्या खेळांचा वापर केला जातो, तर प्रश्नावलीमार्फत मेंदूच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकणाऱ्या संभाव्य जोखीम घटकांचा शोध घेतला जातो.
 
सहभागींची वागणूक आणि इतरांना मदत करण्यासाठी कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या जाऊ शकतात, हे पाहण्यासाठी भविष्यातही अभ्यास सुरू ठेवण्याची योजना आहे.
 
एक्सटर विद्यापीठातील आणि पूर्वी किंग्ज कॉलेज लंडनच्या प्रमुख संशोधक प्रोफेसर अ‍ॅन कॉर्बेट म्हणतात की, साथीच्या काळात मेंदूची शक्ती कमी झाली असावी, असं आत्ताच्या निष्कर्षांच्या आधारे समोर आलंय.
 
“आमचे निष्कर्ष असं सूचित करतात की लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे लॉकडाउन संपल्यानंतरही 50 किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांच्या मेंदूच्या आरोग्यावर वास्तविक, कायमस्वरूपी परिणाम झालाय.
 
“लोकांच्या आकलनशक्तीमध्ये यामुळे घट होऊन स्मृतिभ्रंश होण्याचा संभाव्य धोका आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न येथे उद्भवतो.
 
"आकलनशक्तीत घट झालेल्या लोकांना लवकरात लवकर कशी मदत करता येईल याची खात्री करणं आता अधिक महत्वाचं आहे, विशेषत: काही गोष्टी आत्ताच केल्यास त्यांना नंतर होणाऱ्या स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होऊ शकतो.
 
"म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या स्मरणशक्तीबद्दल काळजी वाटत असेल, तर सर्वोत चांगला उपाय म्हणजे तुमच्या डॉक्टरांची भेट घेणे आणि मेंदूची तपासणी करणं.”
 
ब्रायटन आणि ससेक्स मेडिकल स्कूलमधील स्मृतिभ्रंश तज्ज्ञ डॉ. डोरिना कॅडर यांनी सांगितलं की, साथीच्या रोगाचा सामान्य लोकांवर होणारा परिणाम “आपत्तीजनक” होता.
 
"कोव्हिड -19 चे अनेक दीर्घकालीन परिणाम किंवा उपाय म्हणून जगभरात लागू केलेल्या निर्बंधांबाबत लोकं अनभिज्ञ आहेत.,"
 
याबाबत त्यांनी अधिक संशोधनाची शिफारस केलीय आणि त्या म्हणाल्या की जरी निष्कर्षांमुळे कारणं आणि परिणाम सिद्ध झाले नसले तरी सामाजिक विसलगीकरणासारख्या गोष्टींमुळे मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे काही पुरावे हाती लागले आहेत.
 
लंडनच्या अल्झायमर संशोधन केंद्रातील डॉ सुसान मिशेल यांनी सांगितलं: "वयोमानानुसार आपल्या मेंदूच्या आरोग्यामध्ये आपले अनुवांशिक गुणधर्म महत्त्वाची भूमिका बजावत असतात, आपल्याला माहित आहे की आरोग्य आणि जीवनशैलीचे अनेक घटक आपल्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
 
“खेदाची गोष्ट म्हणजे, स्मृतिभ्रंश रोखण्यासाठी अद्याप कोणताही खात्रीशीर मार्ग नाही. परंतु, आपल्या मेंदूची काळजी घेतल्याने कमीतकमी आपल्या बाजूने शक्यता कमी होण्यास मदत होऊ शकते. निरोगी सवयींचा अवलंब करण्यासाठी उशीर न करता लवकरात लवकर त्या अमलात आणल्या गेल्या पाहिजेत. ज्यामध्ये तुमच्या हृदययाची काळजी घेणं आणि बुद्धी तल्लख ठेवण्याचा समावेश होतो.”
 








Published By- Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती