व्हेपिंग म्हणजे काय? तरुणांमध्ये व्हेपिंगमुळे निर्माण होत आहेत 'या' आरोग्य समस्या

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 12 वर्षीय सारा ग्रिफिनला गेल्या सप्टेंबरमध्ये दम्याचा झटका आला आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
 
चार दिवस हॉस्पिटलमध्ये कोमात असलेल्या साराची प्रकृती सध्या ठीक आहे, पण ‘व्हेपिंग’ (ई-सिगारेट)च्या व्यसनामुळे तिच्या फुफ्फुसांचं खूप नुकसान झालंय.
 
"डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिचं एक फुफ्फुस जवळपास पूर्णपणे निकामी झालंय. त्यांची श्वसनक्षमता 12 वर्षांच्या मुलांऐवजी 80 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीसारखी झालेय.”, असं साराची आई मेरी यांनी बीबीसी प्रतिनिधी डॉमिनिक ह्यूजेस आणि लुसी वॅटकिन्सन यांना सांगितलं.
 
मेरी म्हणतात, "उपचारादरम्यान साराची अवस्था पाहून एक क्षण वाटलं की मला माझ्या मुलीला गमवावं लागेल. मात्र, साराने आता ‘व्हेपिंग’ सोडलंय आणि आता ‘व्हेप’ न करण्याबाबत लोकांचं प्रबोधन करतेय.
 
साराने बीबीसीला सांगितलं की मुलांनी ‘व्हेपिंग’ करण्यापासून दूर राहायला हवं.
 
सारा अवघ्या नऊ वर्षांची असताना तिला ‘व्हेपिंग’चं व्यसन लागलं. दरम्यान भारतातही शाळेत जाणार्‍या लहान मुलांकडे ‘व्हेपिंग’ची उपकरणं सापडण्याच्या घटनांमुळे चिंता वाढलेय.
 
‘मदर्स अगेन्स्ट व्हेपिंग’ या काही मातांनी स्थापन केलेल्या संघटनेने गेल्या ऑक्टोबरमध्ये महिला खासदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, बंदी असतानाही सहा-सात वर्षे वयोगटातील मुलांना ई-सिगारेटसारखी उपकरणं मिळणं हा त्यांच्या आरोग्याशी चाललेला खेळ आहे.
 
ई-सिगारेट म्हणजे काय?
ई-सिगारेट बॅटरीवर चालतात. यामधील द्रव पदार्थ बॅटरीद्वारे गरम केल्यानंतर हुंगल्यावर किंवा श्वासाद्वारे आत घेतला जातो.
 
द्रवामध्ये साधारणपणे तंबाखूपासून तयार केलेल्या निकोटीनचा अंश काही प्रमाणात असतो. याशिवाय प्रोपीलीन ग्लायकॉल, कार्सिनोजेन, अॅक्रोलिन, बेंझिन इत्यादी रसायनं आणि चवींचा वापर केला जातो.
 
पेन, पेनड्राईव्ह, यूएसबी किंवा विविध खेळण्यांच्या रूपात आकर्षक पॅकेजिंगमध्ये आता ही बाजारात उपलब्ध आहेत आणि केवळ परदेशातच नव्हे तर भारतातही या ‘व्हेपिंग’ उपकरणांचा ट्रेंड वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
आकडेवारी काय सांगते?
ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाचे निकाल असं दर्शवतात की 11 ते 17 वयोगटातील पाच मुलांपैकी एकाने ‘व्हेपिंग’चा प्रयत्न केलाय. 2020 च्या तुलनेत हा आकडा तिप्पट आहे.
 
2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलेलं की 11 ते 15 वर्षे वयोगटातील 10 पैकी एकजण याचा वापर करत होते.
 
नॉर्दर्न आयर्लंड चेस्ट, हार्ट अँड स्ट्रोकचे फिडेल्मा कार्टर म्हणतात, ब्रिटनमधील 17 टक्के तरुण नियमितपणे ‘व्हेपिंग’ करतात.
 
या वर्षी जुलैमध्ये ‘थिंक चेंज फोरम’ने केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलंय की भारतातील 14 ते 17 वर्षे वयोगटातील 96% विद्यार्थ्यांना ‘व्हेपिंग’ बंदी आहे हे माहित नाही आणि 89% लोकांना त्याचे धोके काय असू शकतात याची कल्पना नाही.
 
भारतातील ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हे-4 नुसार देशातील 2.8 टक्के किशोरवयीन मुलांनी कधी ना कधी तरी ‘व्हेपिंग’ केलंय.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासानुसार भारतात दरवर्षी सुमारे 10 लाख लोक धूम्रपानामुळे आपला जीव गमावतात.
 
मुलांसाठी दुहेरी धोका
ग्रेटर नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी आणि क्रिटिकल केअरचे अतिरिक्त संचालक डॉ. राजेश कुमार गुप्ता यांनी बीबीसीचे प्रतिनिधी आर. द्विवेदी यांच्याशी संवाद साधताना सांगितलं की, “व्हेपिंगमुळे मुलांसाठी दुहेरी धोका निर्माण होतो, पहिलं म्हणजे त्यात वापरलेली विविध रसायनं, निकोटीन इत्यादीमुळे त्यांच्या फुफ्फुसांचं नुकसान होतं.
 
दुसरं म्हणजे एकदा ‘व्हेपिंग’चं व्यसन लागल्यानंतर भविष्यात सिगारेट किंवा विडी ओढण्याची शक्यता अधिक वाढते."
 
‘द जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’च्या अलिकडील संशोधनात भारतातील 15 ते 30 वयोगटातील 61% तरुण भविष्यात ‘व्हेपिंग’ करू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
 
त्याचवेळी ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल हेल्थ अँड मेडिकल रिसर्च कौन्सिल प्रोग्राम’ अंतर्गत एका आंतरराष्ट्रीय अभ्यासादरम्यान असं दिसून आलंय की, भारतातील 31 टक्के किशोर आणि तरुणांपैकी ज्यांनी पूर्वी ‘व्हेपिंग’ केलं नव्हतं ते भविष्यात याचा अनुभव घेण्यास इच्छुक होते.
 
सिगारेट सोडण्यासाठीचा हा पर्याय नव्हे
दोन दशकांपूर्वी म्हणजेच 2003 मध्ये ई-सिगारेट तयार करणारे चीनी फार्मासिस्ट होन लिक यांनी दावा केलेला की याच्या मदतीने लोकं सहजपणे धूम्रपान सोडू शकतील. पण लोकांना सिगारेटच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ई-सिगारेटमुळे आता जगासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय.
 
ई-सिगारेटचा वापराने सिगारेटचे व्यसन सोडण्यास मदत होते, असं कोणतंही खात्रीलायक संशोधन नाही.
 
‘व्हेपिंग’ सिगारेटपेक्षा कमी प्राणघातक आहे का?
या प्रश्नावर डॉ.राजेश गुप्ता सांगतात की, हे तर असं विचारणं झालं की दोनपैकी कोणतं विष चांगलं आहे. ते म्हणतात, 'ई-सिगारेटद्वारे धूम्रपान सोडण्याची शक्यता पूर्णपणे मूर्खपणाची आहे. हार्वर्ड हेल्थवर प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, ‘व्हेपिंग’ करणाऱ्या लोकांपैकी फक्त 10 ते 14 टक्के लोकंच धूम्रपान सोडू शकतात.
 
पालक चिंतेत
गाझियाबादमध्ये राहणारी विनिता तिवारी एका नामांकित शाळेत शिकवते आणि त्यांच्या मुलीने यावर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलाय.
 
बीबीसीचे सहकारी आर. द्विवेदी यांच्याशी संवाद साधताना विनीता म्हणतात की, आपल्या मुलीला वाईट संगत लागेल याची त्यांना कायम काळजी वाटत असते. त्या नेहमी ती काय करते आणि मित्रांसोबतच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवून असतात.
 
पण हे सर्व इतकं सोपं नाहीए. आपण जर साराच्या प्रकरणाकडे पाहिलं तर साराच्या व्हेपिंगबद्दल छडा लावणं मेरीसाठी सोपं नव्हतं.
 
बेलफास्टमध्ये राहणाऱ्या सारा ग्रिफिनची बेडरूम एखाद्या सर्वसामान्य मुलीसारखी होती. सारा अनेकदा तिचे ड्रेसिंग टेबल धुंडाळायची आणि काही वेळा इतर वस्तूही हलवायची.
 
सारा ते लपवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधायची. कित्येकदा ती तिचे व्हेपिंग उपकरण चादरीखाली लपवून ठेवायची.
 
साराची सकाळ ‘व्हेपिंग’च्या झुरक्याने सुरू व्हायची आणि रात्री झोपण्यापूर्वी झुरका घेणं ही तिची शेवटची गोष्ट असायची.
 
अनेकदा मुलं दबावाखाली अशी पावलं उचलतात
कानपूरच्या पीपीएन डिग्री कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आभा सिंग म्हणतात की मुलं अनेकदा त्यांच्या मित्रांच्या दबावामुळे किंवा ही नवीन फॅशन समजून ‘व्हेपिंग’चा वापर करू लागतात.
 
अशा परिस्थितीत पालकांनी त्याबद्दल जागरुक असणं सर्वात महत्त्वाचं आहे, जेणेकरून ते मुलांना त्याचे तोटे सांगू शकतील, असं त्यांचं मत आहे.
 
थिंक चेंज फोरमच्या सर्वेक्षणात 39% किशोरवयीन मुलांनी कबूल केलं की त्यांना पालक, शिक्षक किंवा माध्यमांद्वारे ई-सिगारेटच्या हानिकारकतेबद्दल माहिती मिळाली.
 
निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी नाही
18 सप्टेंबर 2019 रोजी भारतात ई-सिगारेटवर बंदी घालण्यात आली. या संदर्भात, 5 डिसेंबर 2019 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं, ज्यानुसार ई-सिगारेटचे उत्पादन, साठवण, आयात, निर्यात, खरेदी, विक्री या सगळ्यावर बंदी घालण्यात आलेय.
 
पहिल्यांदा गुन्हा केल्यास एक वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
 
पुन्हा दोषी आढळल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड होऊ शकतो.
 
तरीही, वस्तुस्थिती अशी आहे की निर्बंध असूनही ई-सिगारेट किंवा व्हेपिंग उपकरणं सहज उपलब्ध आहेत. ती ऑनलाइन देखील खरेदी केली जाऊ शकतात. परंतु शाळांच्या आसपास त्यांची विक्री होणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
 
‘मदर्स अगेन्स्ट व्हेपिंग’ने महिला खासदारांना लिहिलेल्या पत्रात हे अधोरेखित केलंय. यामध्ये खासदारांना निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आलंय.
 
निर्बंधांच्या बाबतीत ब्रिटनमध्येही अशीच परिस्थिती आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना व्हेपिंग उपकरणं विकण्यावर बंदी आहे. पण सारा ग्रिफिनने ते काउंटरवरून मिळवलं.
 
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे निर्बंध आणखी कडक करण्याच्या तयारीत आहेत.
 
लहान मुलांसाठी व्हेपिंग उपकरणं आणि फ्लेवर्ड गम इत्यादी गोष्टींचे पॅकेजिंग आकर्षक बनवण्याबरोबरच, दुकानांमध्ये त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची तयारी केली जातेय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती