पुणे : राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातील गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण 4751 पदांपैकी तब्बल चार हजार पदे परिचारिकांची असून त्यासाठी येत्या 25 मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत येणारी गट-क परिचर्या, तांत्रिक व अ तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार त्या त्या पदासाठी निर्धारित केलेली वेतनश्रेणी व नियमानुसार लागू असणारे भत्ते दिले जाणार आहेत. रिक्त पदे सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमानुसार भरली जाणार आहेत.
अनुसूचित जमातीसाठी 321 आणि अनुसूचित जातीसाठी 338 पदे तर उर्वरित पदे इतर संवर्गासाठी आहेत.
इतर पदे...प्रयोगशाळा सहाय्यक 170, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 112, ग्रंथपाल 12, स्वच्छता निरीक्षक 9, ईसीजी तंत्रज्ञ 36,आहारतज्ञ 18 ,औषधनिर्माता 169 , कॅटलॉग/ ग्रंथसूचीकार 19 , समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) 86 , ग्रंथालय सहाय्यक 16 , व्यवसायोपचारतज्ञ/ ॲक्युपेशनथेरपीस्ट7 , दूरध्वनी चालक 17 , महिला अधीक्षिका किंवा वॉर्डन वसतिगृहप्रमुख 05 , अंधारखोली सहाय्यक 10, किरण सहाय्यक 23, सांख्यिकी सहाय्यक 3 , शिंपी 15 , वाहन चालक 34 , गृहपाल 16 अशा विविध पदांची जाहिरात संचालनालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.