तिच्या खात्यात अचानक 55 कोटी रुपये आले, 10 कोटींचं घर घेतलं आणि 7 महिन्यांनंतर...
देवमनोहरी मनिवेल स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती मानू लागली होती. कारण तिच्या खात्यात जवळपास 55.79 कोटी रुपये अचानक जमा झाले होते. कोणीतरी अनवधानाने तिच्या खात्यावर ही रक्कम जमा केली होती.
पण आता देवमनोहरी आणि तिच्या मैत्रिणींचं टेन्शन वाढलंय.
देवमनोहरीने तिच्या खात्यात जमा झालेले सर्व पैसे परत करावेत, असा आदेश ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाने दिला. शिवाय व्याजासह ही रक्कम परत करावी असेही निर्देश दिले आहेत.
मे 2021 मध्ये घडलेला हा प्रकार crypto.com ने केलेल्या एका चुकीमुळे झाला होता.
मनिवेल ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे राहतात. मनिवेलला crypto.com ने 100 डॉलर्सच्या बदल्यात 1,04,74,143 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच 70 लाख यूएस डॉलर देऊ केले.
ज्या व्यक्तीने हा व्यवहार केला त्याच्याकडून ही चूक झाल्याचं ऑस्ट्रेलियन मीडियाचं म्हणणं आहे. त्या व्यक्तीने व्यवहार करताना स्वतःच्या खात्याचा क्रमांक टाकण्याऐवजी मनिवेलचा खाते क्रमांक टाकला. त्यामुळे सगळे पैसे तिच्या खात्यावर आले.
पैसे आल्यामुळे मनिवेल करोडपती झाली. तिने अफाट खर्च करायला सुरुवात केली.
यातील बहुतांश रक्कम तिने दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केली होती. हे खातं मनिवेलने तिच्या मित्रासोबत सुरू केलं होतं.
या रकमेतील सुमारे 2.3 कोटी रुपये मनिवेलने तिच्या मित्राच्या आणि त्याच्या मुलीच्या खात्यावर पाठवले. याशिवाय मनिवेलने मेलबर्नमध्ये घरही विकत घेतलं. मलेशियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या, थिलगावती गंगादरी यांच्या नावावर तिने हे घर विकत घेतलं होतं.
500 चौरस मीटरच्या या घरात चार खोल्या, चार बाथरूम, सिनेमा हॉल, जिम आणि डबल गॅरेज आहे. यासाठी तिने 10 कोटी रुपये मोजले.
पण दुसऱ्या बाजूला क्रिप्टोकरन्सी कंपनीला आपली चूक लक्षात यायला बरेच महिने लागले.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेम्स इलियट यांनी शुक्रवारी या खटल्याचा निकाल दिला.
न्यायालयाचा निकाल
या प्रकरणात न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला. संपूर्ण रकमेसह व्याज व कायदेशीर कारवाईचा खर्च देण्याचेही आदेश दिले.
खात्यात चुकीने जमा झालेल्या पैशातून घर खरेदी केल्याचं सिद्ध झाल्यावर न्यायालयाने मनिवेलच्या बहिणीला घर विकून रोख रक्कम जमा करण्याचे आदेशही दिले.
क्रिप्टो करन्सी कंपनीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनिवेलविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली होती. दरम्यान तिची सर्व बँक खाती गोठवण्यात आली.
पण तिच्याकडे जमा झालेले पैसे आधीच इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर झाले होते.
क्रिप्टो कंपनीने मनिवेलच्या बहिणीची खाती देखील गोठवण्याची मागणी केली होती.