शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी 'या' गोष्टी करा
गुरूवार, 20 एप्रिल 2023 (17:22 IST)
- श्रीकांत बंगाळे
महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती.
पण, या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणं, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणं या बाबी समोर आल्या होत्या.
त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं या योजनेत सुधारणा केली आहे.
त्यानुसार, आता राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.
अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यासही आर्थिक मदत दिली जाणार आहे.
अपघातात 2 अवयव निकामी होऊन शेतकऱ्याला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, तर 1 अवयव निकामी होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? अपघाताचे कोणते प्रकार मदतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत? आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल? या प्रश्नांची उत्तर आता आपण जाणून घेणार आहोत.
पात्रता काय?
ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, असे सर्वच शेतकरी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकणार आहेत.
पण, ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, तर अशा कुटुंबातील कोणताही 1 सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा 10 ते 75 या वयोगटातील असावा.
हे अपघात लाभासाठी पात्र
शेतकऱ्याचा अपघात पुढील कारणांमुळे झाला असल्यास या योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला अर्ज करता येणार आहे.
रस्ता किंवा रेल्वे अपघात
पाण्यात बुडून मृत्यू
जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा
विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
वीज पडून मृत्यू
खून
उंचावरून पडून झालेला अपघात
सर्पदंश व विंचूदंश
नक्षलाईटकडून झालेल्या हत्या
जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू
बाळंतपणातील मृत्यू
दंगल
'हे' अपघात अपात्र
पुढील अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अंपगत्व आल्यास ते या योजनेसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही.
नैसर्गिक मृत्यू
योजना सुरू होण्यापूर्वीचे अपंगत्व
आत्महत्येचे प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे
गुन्ह्याच्या उद्देशानं कायद्याचं उल्लंघन करताना झालेला अपघात
अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात
भ्रमिष्टपणा
शरीरांतर्गत रक्तस्राव
मोटार शर्यतीतील अपघात
युद्ध
सैन्यातील नोकरी
अर्ज कुठे व कसा करायचा?
शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या 30 दिवसाच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव संबंधित कुटुंबानं तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे.
एका साध्या कागदावर अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहून अर्ज करायचा आहे. यात स्वत: बद्दलची माहिती लिहून मग मयताचं नाव, त्यांच्यासोबतचं नाव, मृत व्यक्तीच्या मृत्यूचं कारण, तारीख लिहायची आहे.
अपघातात मृत्यू झाला की अपंगत्व आलं, तेही लिहायचं आहे.
पुढे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लाभ मिळावा, असंही लिहायचं आहे.
ही प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यास महसूल, पोलिस आणि कृषी अधिकाऱ्यांचं पथक प्रत्यक्षात घटनास्थळी भेट देवून चौकशी करेल आणि 8 दिवसांच्या आत आपला अहवाल तहसीलदारांना देईल.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समिती 30 दिवसांच्या आत शेतकरी कुटुंबाला मदत देण्याबाबत निर्णय घेईल.
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
या योजनेसाठीच्या अर्जासोबत मृत्यूचं कारण स्पष्ट करणारा सरकारी कागद जसं की FIR, मेडिकल रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जोडणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय, पुढील कागदपत्रं जोडावी.
सातबारा उतारा
मृत्यूचा दाखला
शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद
शेतकऱ्याच्या वयाची खात्री होईल यासाठी त्याचे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र
मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल (FIR) किंवा स्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटलाचा अहवाल