टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं 119 धावा करूनही पाकिस्तानला कसं हरवलं?
सोमवार, 10 जून 2024 (08:54 IST)
अवघ्या 119 रन्स करूनही भारतानं ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानला 6 रन्सनी हरवलं. या विजयासोबतच भारतानं स्पर्धेच्या साखळी फेरीत ग्रुप 'ए' मध्ये पुन्हा अव्वल स्थान गाठलं.
शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आणि अमेरिकेतही भारतीय चाहत्यांनी जल्लोष केला.
न्यूयॅार्कच्या मैदानात भारतीय फलंदाजीची अक्षरशः पडझड झाली होती. पण भारतीय गोलंदाजांनी विजयश्री खेचून आणली. तीन विकेट्स काढणारा जसप्रीत बुमरा सामनावीर ठरला.
ट्वेन्टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतानं एवढ्या छोट्या लक्ष्याचं यशस्वी रक्षण केलं.
न्यूयॉर्कच्या 'नासॉ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर' होत असलेल्या या सामन्यात या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
पावसानं वारंवार व्यत्यय आणल्यामुळे सामना थोडा उशीरानं सुरू झाला. सुरुवातीपासून खेळावर पाकिस्तानी गोलंदाजांचं वर्चस्व दिसलं. पण त्यामानाने पाकिस्तानी फलंदाजांना तितकी चमकदार कामगिरी करता आली नाही.
जसप्रीत बुमराची कमाल
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात बुमरानं चार ओव्हर्समध्ये फक्त 14 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स काढल्या. त्यानं 15 डॉट बॉल्सही टाकले.
त्यानं बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमदची विकेट काढली आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं.
या कामगिरीसाठी बुमराला सामनावीराचा किताब देण्यात आला. सलग दुसऱ्या सामन्यात बुमरा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.
खरं तर बुमराला दुखापतीमुळे मागच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात खेळता आलं नव्हतं. पण यावेळी तो भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ बनला आहे.
15 व्या ओव्हरमध्ये बुमरानं मोहम्मद रिझवानला माघारी धाडलं, तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. रिझवाननं सलामीला खेळताना एक बाजू लावून धरली होती. पण त्याची विकेट पडताच पाकिस्तानचा धावांचा ओघही आटला आणि त्यांच्यावर दबाव वाढल्याचं दिसलं.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या इतर गोलंदाजांची कामगिरीही महत्त्वाची ठरली.
मोहम्मद सिराजनं 4 ओव्हर्समध्ये केवळ 19 धावा दिल्या. हार्दिक पंड्यानं 4 ओव्हर्समध्ये 24 धावा देत 2 विकेट काढल्या.
तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक विकेट काढली आणि जसप्रीत बुमराला चांगली साथ दिली.
शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी 18 रन्स हव्या होत्या. अर्शदीपनं या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर इमाद वसीमची विकेट काढली. नसीम शाहनं दोन चौकार लगावले, पण ते अपुरे ठरले आणि पाकिस्ताननं सामना गमावला.
पाकिस्तानचा हा स्पर्धेतला सलग दुसरा पराभव आहे. याआधी यूएसएनं त्यांना धूळ चारली होती.
अशी झाली टीम इंडियाची पडझड
हा सामना जिंकला असला, तरी फलंदाजांची कामगिरी ही भारतासाठी चिंतेची बाब ठरली आहे.
टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध 20 ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. 19 ओव्हर्समध्येच दहाही फलंदाज बाद झाले. ऋषभ पंतचा अपवाद वगळता कुणालाही चाळीस धावांची वेस गाठता आली नाही.
भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली ही स्टार जोडी सलामीला उतरली. पण विराटची विकेट लवकर पडली.
नसीम शाहने कोहलीला बाद केलं तर शाहीन शाह आफ्रिदीने रोहितची विकेट काढली. विराट कोहली अवघ्या चार रन करून माघारी परतला. तर रोहित शर्माही 13 धावांवर बाद झाला.
त्यानंतर आलेला अक्षर पटेल 29 रन्सच करू शकला. सूर्यकुमार यादवकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा होती, पण तो सातच धावा करू शकल्या.
ऋषभ पंतनं मिळालेल्या जीवदानांचा फायदा उठवत 42 रन्स केल्या. त्यानं सहा चौकारही लगावले. पण मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर ऋषभ बाद झाला आणि पुढच्याच बॅालवर रविंद्र जाडेजा भोपळा न फोडता माघारी परतला.
हार्दिक पंड्या सात रन्सवर बाद झाला. हारिस रौफनं पंड्या आणि जसप्रीत बुमराला लागोपाठच्या चेंडूंवर बाद केलं. अर्शदीप सिंग रनआऊट झाला.
पाकिस्तानसाठी हारिस रौफ आणि नसीम शाहनं प्रत्येकी तीन, मोहम्मद आमीरनं दोन तर शाहीन शाह आफ्रिदीने एक विकेट काढली.