पाकिस्तानच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. पंजाब प्रांतात पहिल्यांदाच एका महिलेला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आणि पीएमएल-एन नेत्या मरियम नवाज पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री होणार आहेत. 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये संसदीय आणि प्रांतीय निवडणुकांसाठी मतदान झाले होते. केंद्रातही पीएमएल-एन आघाडीचे सरकार बनवत आहे. मरियम नवाज पंजाब प्रांतात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या देशातील पहिल्या महिला नेत्या होण्याचा मानही मरियमला मिळणार आहे.
50 वर्षीय नेत्या मरियम या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा देखील आहेत. मरियमच्या शपथविधीची अधिक चर्चा आहे कारण 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील पाच प्रांतांमध्ये पंजाब ही पहिली प्रांतिक विधानसभा आहे, ज्याचे उद्घाटन सत्र जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवारी विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे.
पंजाब प्रांताचे राज्यपाल बलिगुर रहमान यांनी शुक्रवारी पंजाब विधानसभेचे अधिवेशन बोलावले आहे. वृत्तानुसार, मरियमला मुख्यमंत्र्यांना दिलेली सुरक्षा आधीच देण्यात आली आहे. सामान्यतः मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारा प्रोटोकॉल मरियमला देण्यात आला आहे.