Israel: वेस्ट बँक वस्तीमध्ये गोळीबार, सहा इस्रायली जखमी,दहशतवादी ठार

बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (15:02 IST)
एका पॅलेस्टिनी अतिरेक्याने वेस्ट बँकमधील ज्यू वस्तीत लोकांच्या गटावर गोळीबार केला. या हल्ल्यात सहा इस्रायली नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मलेह अडुमिममध्ये एका दहशतवाद्याने लोकांच्या गटावर गोळीबार केला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने त्या बंदूकधाऱ्याला गोळ्या घातल्या.
 
मुहन्नाद मोहम्मद अल-मझाराह असे हल्लेखोराचे नाव असून तो इस्रायल पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठार झाला. जेरुसलेमच्या दोन रुग्णालयांनी सांगितले की त्यांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या एका किशोरवयीन मुलासह सहा जणांना दाखल केले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
 
हल्लेखोराला ठार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लयाच्या वेळी ते सलून मध्ये होते. यावेळी त्याला गोळीबार आणि लोकांच्या आरडाओरडाचा आवाज ऐकू आला. बाहेर जाऊन पाहिलं तर पिवळी बनियान घातलेला आणि पिस्तुल हातात धरलेला एक माणूस दिसला. मला खात्री नव्हती की तो दहशतवादी आहे. मी त्याला थांबण्यासाठी ओरडले आणि माझी बंदूक काढली. त्याने माझ्यावर गोळीबार सुरू केला आणि मला समजले की तो एक दहशतवादी आहे. त्यानंतर मी प्रत्युत्तरादाखल गोळीबारात हल्लेखोराला ठार केले. 
 
इस्रायलचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी बंदूकधारी मारणाऱ्या अधिकाऱ्याचे आणि नागरिकांना शस्त्रे पुरवण्याच्या सरकारच्या धोरणाचे कौतुक केले. हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितले की, नागरिकांना शस्त्र उपलब्ध करून देण्याचे धोरण निर्णायक ठरत आहे.

मंगळवारी संध्याकाळी दुसऱ्या एका घटनेत एका पॅलेस्टिनी अतिरेक्याने इस्रायली सैनिकांवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी त्याचा खात्मा केला. या घटनेत कोणतेही सैनिक जखमी झाले नसल्याचे इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले.
 
Edited by - Priya Dixit    
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती