मंगळवार 26 जूनची ही गोष्ट. 17 वर्षांचा नाहेल M नावाचा एक तरुण पॅरिसजवळच्या नॉनटेअर उपनगरात गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याची गाडी अडवली.
पोलिसांनी त्याच्यावर बंदूक रोखली, पण त्या तरुणाने गाडी पळवली, त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गाडी पुढे जाऊन धडकली, पण तोवर नाहेलच्या छातीत गोळी घुसली होती.
उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सध्या पॅरिसभोवतीचा भाग पेटला आहे. एका किशोरवयीन मुलाच्या अशा मृत्यूनंतर लोक रस्त्यांवर उतरून आंदोलनं करू लागले.
या आंदोलनात जाळपोळ आणि लूटमारीच्या घटनाही घडताना दिसतायत, म्हणून आतापर्यंत पोलिसांनी 1000हून अधिक लोकांना अटक केली आहे. फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी म्हटलंय की देशभरात 40 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या तरुणाची हत्या 'अनाकलनीय' आणि 'अक्षम्य' घटना असल्याचं म्हटलंय, पण लोकांना शांततेचं आवाहन केलंय.
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न म्हणाल्या आहेत की त्या लोकांच्या भावना समजू शकतात, पण उसळलेल्या दंगलींचा त्यांनी निषेध केला. 'असा हिंसाचार योग्य नाही,' असं त्या म्हणाल्या.
City of Love म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरीसमधली परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. आता त्या पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे, आणि तो स्वतः पोलिसांच्या ताब्यात आहे.
पण या मृत्यूवरून आंदोलनं का सुरू झाली?
एका मृत्यूवरून एवढा तणाव का?
ट्रॅफिक पोलिसांच्या हातून मृत्यू होण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. अशा प्रकारची ही 2023मधली दुसरी घटना आहे, आणि गेल्या वर्षी 2022मध्ये अशाच घटनांमध्ये 13 मृत्यू झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच याविषयी असंतोष होता.
त्यात आता एका टीन एजरचा मृत्यू झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. फ्रान्समधल्या पोलिसांकडे असलेले अधिकार, ते ज्या प्रकारे एखादी परिस्थिती हाताळतात आणि ज्या प्रकारे ठराविक वंशाच्या नागरिकांना वागणूक दिली जाते. याबद्दल आंदोलक नाराजी व्यक्त करतायत.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार 2017 पासून फ्रान्समध्ये अशा प्रकारे ट्रॅफिक तपासणीदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारांत ज्यांचे मृत्यू झाले, ते कृष्णवर्णीय किंवा अरब वंशाचे होते.
पण या घटनेविषयी बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.
बीबीसी प्रतिनिधी ह्यू शोफील्ड यांच्यामते समोर आलेल्या काही सेंकदांच्या व्हीडिओंमधून पूर्ण चित्र खरंच स्पष्ट होत नाही. पोलिसांनी गाडी थांबवायला सांगितल्यानंतरही त्या तरुणाने गाडी का पळवली, त्यांच्यात त्या क्षणापूर्वी काय संवाद झाला, हे अजूनही स्पष्ट नाही.
आपल्याला या तरुणाकडून धोका आहे असं वाटल्याने आपण गोळी झाडली, असं गोळीबार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने म्हटलंय. त्याने नाहेलच्या कुटुंबाची माफी मागितलीय.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणालेत की, “जे काही झालं, ते कुठल्याही परिस्थिती पटणारं नाही. जे व्हीडिओमधून दिसतंय, तपासाअंती खरंच तसं काही समोर आलं तर ते अजिबात योग्य नसेल. आम्हाला आशा आहे की पूर्ण सत्य लवकरच समोर येईल.”
त्यांच्या या वाक्यातून असं वाटतंय की हे अर्धवट चित्र आहे. आणि फ्रान्समधल्या पोलीस संघटनांनी मॅक्रॉन सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली आहे. अलायन्स पोलीसने एका निवेदनात म्हटलं की, "राष्ट्राध्यक्षांनी जे म्हटलं, त्यावर विश्वासच बसत नाही. कारण त्यांनी यापूर्वी नेहमीच पोलिसांना पाठिंबा दिला आहे. या प्रकरणी कोर्टात न्यायदान होण्यापूर्वीच त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे सरकार आणि कायदा-सव्यवस्था ही दोन संस्थानं वेगवेगळी ठेवणं शक्य होणार नाही."
मग सरकारने अशी भूमिका घेतल्यामुळे पोलिसांना फ्रान्समधली परिस्थिती हाताळणं कठीण जातंय का?
फ्रेंच सरकारने अशी भूमिका का घेतली? - ह्यू शोफील्ड यांचं विश्लेषण
मॅक्रॉन आणि फ्रेंच सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. यामागे दोन कारणं असू शकतात – जे काही घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आणि सोशल मीडियावर झपाट्याने पसरलं. प्रथमदर्शनी सगळेच हे म्हणू शकतात की पोलिसांनी शक्तीचा गैरवापर करून गोळीबार केला. लोकांच्या या भावनेच्या विरोधात सरकारला भूमिका घेणं परवडणारं नव्हतं.
दुसरी गोष्ट म्हणजे, सरकारला हीच भीती होती की चिथावलेले लोक जाळपोळ करतील, त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी नेत्यांनी या प्रतिक्रिया दिल्यात. पण अजूनही पॅरिस आणि शेजारच्या शहरांमध्ये जाळपोळ, लूटमार आणि अराजकता पसरली आहे, ज्यामुळे पुन्हा पोलीस विरुद्ध जनता, असा संघर्ष रस्त्यांवर घडताना दिसतोय.
आत्ताचा हिंसाचार नोव्हेंबर 2005च्या दंगलींची आठवण करून देणारा आहे, जेव्हा अशाच दोन टीनएजर्सच्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळला होता.
फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सरकारविरोधात वेगवेगळी मुद्दायांवरून तीव्र आंदोलनं पाहायला मिळाली आहेत – अगदी पेन्शनपासून ते इंधन दरवाढीपर्यंत. त्यामुळे मॅक्रॉन सरकारला आत्ताची परिस्थिती हाताळताना खूप विचार करावा लागणार आहे.
आत्ता मॅक्रॉन आणि त्यांच्या मंत्र्यांनी मोजूनमापूनच शब्द वापरले आहेत.