शनिवार, 14 डिसेंबर 2024 (05:19 IST)
नको नको हा चावट धंदा परदोषेक्षण नरा ॥
फुकाचा कालक्षेप पामरा ॥ध्रु०॥
घडी घडीनें काळ खातसे आयुष्य करुनी त्वरा ॥
येतसे शीघ्र शरीरीं जरा ॥
दया नसे त्या यमराजाला देह चिरी चरचरां ॥
फिरविशी डोळे तैं गरगरां ॥चाल०॥
म्हणुनी पाय गुरुचे धरा ॥
मुखानें दत्त दत्त हें स्मरा ॥
अंतीं मोक्षसुखाला वरा ॥
देह नासुनी होईल मुरदा जाळिती भडभड खरा ॥
मानसीं विचार करीं रे बरा ॥नको०॥१॥
कोण कोठुनी जासी कोठें कोण असे आसरा ॥
विचारीं नित्य मनीं प्रियकरा ॥
रांडापोरें राहतील मागें रडशील गददस्वरा ॥
भोगिती अन्य वित्तदारा ॥चाल०॥
हिताचे बोल मनीं हे धरा ॥
समर्पण दत्तपदीं तनु करा ॥
सुखाचा राजमार्ग हा खरा ॥
जितेपणीं हा रंग बधुनी घे मूळ सुखाचा झरा ॥
सोडुनी आडवाट ये घरा ॥नको०॥२॥
*********************
ध्याईं मनीं तूं दत्तगुरु ॥ध्रु०॥
काषायांवर चरणीं पादुका, जटाजूट शिरीं ऋषिकुमरु ॥ध्याई०॥१॥
माला कमंडलु शूल डमरु करीं, शंख चक्र शोभे अमरु ॥ध्याई०॥॥
पतितपावन तो नारायण, श्वान सुरभिसम कल्पतरु ॥ध्याई०॥३॥
स्मृर्तृगामी कलितार दयाधन, भस्म, विभूषण रङग वरु ॥ध्याई०॥४॥
*********************
नमूं नमूं बा यतिवर्या । दत्तात्रेया दिगंबरा ॥
सोडुनी भवसुखाची आशा । शरण तुजला आलों मी ॥ध्रु०॥
न करीं स्नान संध्या ध्यान । नाहीं केलें तव पूजन ॥
स्तोत्र पाठ पारायण । नाहीं केलें कदाचन ॥१॥
न कळे काव्य आणि गान । नाहीं व्युत्पत्तीचें ज्ञान ॥
भाव एक शुद्ध पूर्ण । रितें आन सर्वही ॥२॥
तूंचि माय बाप सखा । बंधू भगिनी आणि भ्राता ॥
इष्ट मित्र तूंचि त्राता । भक्तांचा पालकू ॥३॥
वेडें वांकुडें शेंबडें । बाळ ओंगळ धाकुटें ॥
नाहीं ऐकिलें देखिलें । मायबापें अव्हेरिलें ॥४॥
देव भावाचा भुकेला । ऐकुनी पांडुरंग-धांवा ॥
सच्चिद् आनंदाचा गाभा । उभा ठेला अंतरीं ॥५॥
*********************
दत्ता येईं रे ॥ जिवलगा ॥ प्राणविसाव्या माझ्या ॥ध्रु०॥
तुज विण चैन नसे, चैन नसे, काम न कांहीं सूचे ॥
तारक कोण असे, नव दीसे, आन न कोणी भासे ॥
अनाथनाथ असा, अवधूता, तूंचि एक भगवंता ॥
येई येईं बा, गुरुराया, संतांच्या माहेरा ॥दत्ता०॥१॥
बुडतों भवडोहीं, पैलथडी सत्वर नेईं कुडी ॥
लाटा उसळतीं, विषयांच्या, कामक्रोधमोहाच्या ॥
ममतामगरीनें, मज धरिलें, कांहीं न माझें चाले ॥
पहासी कां न असा, बा सदया, संहर दुस्तर माया ॥दत्ता०॥२॥
जन्मुनी नरदेहीं, म्यां कांहीं, सुकृत केलें नाहीं ॥
प्रचंड उभारिले, पापाचे, डोंगर दुष्टकृत्याचे ॥
धांवे झडकरी, असुरारि, कृपावज्र करीं घेईं ॥
कर्माकर्मातें, ने विलया, देईं अभय दासा या ॥दत्ता०॥३॥
गुरुजन साधूंची, देवाची, निंदा केली साची ॥
ऋषिमुनि निंदियले, वंदियले, म्लेंच्छग्रंथ ते सारे ॥
अमृत सोडुनियां, स्वगृहीचें, परगृहमदिरा झोंकें ॥
झालो क्षीण अतां ही काया, धांव धांव यतिराया ॥दत्ता०॥४॥
माता झुगारितां, लवलाही, तान्हें कोठें जाई ॥
तूंचि सांग बरें, कोणी कडे, तुज विण जाण घडे ॥
कोठें ठाव नसे, त्रिभुवनीं, तुज विण रानींवनीं ॥
लागें दीन असा, तव पायां , दे रंगा पदछाया ॥दत्ता०॥५॥
सदा त्वां भावें संतांचे चरण धरावे ॥ध्रु०॥
उपदेश जरी ते नव देती। दर्शनमात्रें जन उद्धरिती ॥
स्वैरालापें शास्त्रें कथिती । लक्ष असावें ॥संतांचे०॥१॥
विद्याधनजनगर्व त्यजवा । मूक बोध तो श्रवण करावा ॥
अहंपणा मूळीं खंडावा । अल्प वदावें ॥संतांचे०॥२॥
आज्ञा वरचे वरी झेलावी । गृहकृत्यें तीं सर्व करावी ॥
उंचनीच ही मति दवडावी । गुणगण नावे ॥संतांचे०॥३॥
प्रसंग पाहुनी प्रश्न करावा । संशय मनीं तिळभरी नुरवावा ॥
सेवे काजीं देह झडावा । मरुनी उरावें ॥संतांचे०॥४॥
मूर्ति सांवळी नित्य स्मरावी । अन्योन्यांतें हेचि कथावी ॥
रङग वल्गना अन्य त्यजावी । समरस व्हावें ॥संतांचे०॥५॥
****************************
गुरुगुण गावे जरी तुजला सौख्य असावें ॥ध्रु०॥
काम क्रोध षड्रिपु मर्दावे ! क्षमा शांति सन्मित्र वरावे ॥
सदा संतपदकंज घरावे । तरीच जगावें ॥जरी०॥१॥
यमनियमादीं सादर व्हावें । शीलपालनीं दक्ष असावें ॥
पर उपकारी आधीं मरावें । बहुश्रुत व्हावें ॥जरी०॥२॥
परगुणकथनीं प्रेम असावें । निजकथनीं त्वां मौन धरावें ॥
दोषेक्षण अवधें सोडावें । समदृग व्हावें ॥जरी०॥३॥
पाद तीर्थयात्रें झिजवावें । श्रवण हरिकथाश्रवणीं भावें ॥
गुरुगुणगानीं मुख रत व्हावें । नम्र असावें ॥जरी०॥४॥
कीर्तीनें जग सर्व भरावें । सहज कर्य तें नित्य करावें ॥
रङ्ग वासनामूळ नसावें । स्थिरमति व्हावें ॥जरी०॥५॥
****************************
येईं बा सद्गुरुराया । निरसीं भवबंधन माया ॥ध्रु०॥
पहासी असा किती अंत अनंता । काय मागसी मज भगवंता ॥
पापी असें तरीं तूं अघत्राता । धांवत ये सदया ॥येईं बा०॥१॥
तुज विण कोणा बाहूं समर्था । तारक त्रिभुवनीं आन न नाथा ॥
गाऊनी गाथा नमवूं माथा । अभय करीं सखया ॥येईं बा०॥२॥
गुंतलासी कोठें गुरुनाथा । उपेक्षिसी कां दीन अनाथा ॥
मरतो तव विरहें अजी ताता । तारीं रङग कृपया ॥येईं बा०॥३॥
****************************
औदुंबर तळीं उभा नरहरी, भक्तांची अंतरीं वाट पाहे ॥१॥
सुंदर तें ध्यान पाहातां तत्क्षण, वेडावलें मन नाचूं लागे ॥२॥
अंगांची ते कांति कोण वर्णी दीप्ति, कोटि चंद्र ज्योति नेत्रीं वसे ॥३॥
काषाय कौपीन छाटी प्रावरण, सच्चित्सुखघन ब्रह्म पूर्ण ॥४॥
दंडपात्र हातीं सुगंधी विभूति, हार कंबुकंठी शोभतसे ॥५॥
भक्तां साठीं ठेला अनेकीं एकला, गुणागुणकाला रङगदिव्य ॥६॥
****************************
धांव धांव दत्ता किती बाहूं आतां ।
चैन नसे चित्ता येईं वेगीं ॥१॥
येई वेगीं दत्ता तूंचि माता पिता ।
आन नसे त्राता कोणी जगीं ॥२॥
जगीं माय बाप तूंचि सखा कृप ।
स्वस्वरुपीं थाप बाळ तुझें ॥३॥
बाळ तुझें माई अंकावरी घेईं ।
बोधस्तन देईं मुखीं माझ्या ॥४॥
मुखीं माझ्या शोष पडतो विशेष ।
प्रेमरस धीश पाजीं रङगा ॥५॥
****************************
धेंनु जेवीं वत्सा धांव दत्ता तैसा ।
तुज विण कैसा राहूं जगीं ॥१॥
कोठें जाऊं आतां कोण करी शांत ।
तुज विण त्राता आन नसे ॥२॥
येईं येईं दत्ता पतितोद्धर्ता ।
भवभयहर्ता तूंचि माझा ॥३॥
नको पाहूं अंत सदया अनंत ।
उद्धरीं हा जंत रङग तोका ॥४॥
********************
तुझ्या द्वारींचा भिकारी । नको धाडूं द्वारोद्वारीं ॥१॥
ब्रीद जाईल जाईल । कीर्ति लोपेल सकळ ॥२॥
दासा घेईं बा पदरीं । माझी स्वीकारीं नादारी ॥३॥
आप्त बंधु तूंचि एक । माय बाप गुरु सख ॥४॥
नेणें तुज विण अन्य । आलों शरन शरण्य ॥५॥
चरणी लोळूं दे निःसंग । जेणें धन्य जगीं रङग॥६॥
********************
बहुत दिनांचा उपवासी । आलों आशें तुज पाशीं ॥१॥
देईं उच्छिष्ट भोजन । तेणें संतुष्ट हें मन ॥२॥
नसे पक्वान्नाची चाड । शेष भाजी पाला गोड ॥३॥
जेणें भंगे भवभय । रङग होई ही तन्मय ॥४॥
********************
मन मर्कट चंचल । धांवे सैरावैरा खळ ॥१॥
मोहमदिरा पीऊन । नाचे विषयवृक्षीं जाण ॥२॥
शस्त्र निःसंगे ताडिजे । दोर अभ्यासें बांधिजे ॥३॥
ध्यानधारणे लाविजे । आत्म रङग तैं पाविजे ॥४॥
********************
मन बंधाचें कारण । मन नेई स्वर्गी जाण ॥१॥
मन मोक्षाचें जीवन । करीं अभ्यासें बा क्षीण ॥२॥
मन प्राण एकवटे । वृत्ति तिळ तिळ तूटे ॥३॥
होतां निःशेष संकल्प । रङग भेटे सच्चिद्रूप ॥४॥
********************
मन संसृतिसांकडें । मनें लावियेलें वेडें ॥१॥
भुलुनी आत्मसुख बळें । हाडचामीं जीव खेळे ॥२॥
कोण कोठोनी ना कळे । नाहीं तेथें जीव भूले ॥३॥
अवघा संकल्पाचा खेळ । परब्रह्म तें निर्मळ ॥४॥
अभ्र सारितां आकाश । चित्रमूळीं पटभास ॥५॥
स्पंदनिःस्पंदरहित । भासे रंग सच्चित्सुख ॥६॥
********************
अपकारी आला द्वारीं उभा ठेला । दुःखें पीडियेला शांतवी जो ॥१॥
तोचि साधु भला नको टिळे माळा । देवाला कंटाळा सोंगाचा ह्या ॥२॥
दया क्षमा शांति नित्याचे सांगाती । क्रोध नसे चित्तीं देव तोचि ॥३॥
अभय अचल मन तें निर्मळ । जैसें गंगाजळ वंद्य लोकीं ॥४॥
स्वप्नीं परनिंदा नसे नीच धंदा । परोपरी वंदा जीवें भावें ॥५॥
देहदंड खंड पापाचें उदंड । मायामय बंड जेथें नसे ॥६॥
राही तो स्मशानीं रंग जनीं वनीं । साक्षाज्जनार्दनीं भेद नसे ॥७॥
********************
विदेशी विद्येच्या नादीं लागियेलों । स्वार्थास मूकलों धांव आतां ॥१॥
निंदियेले संत सज्जन महंत । भवसुखजंत तारीं देवा ॥२॥
देवहीन रंक वाढलों मी शंख । अविद्येचा पंक क्षाळीं वेगीं ॥३॥
नीचाहुनी नीच परी तव दास । करीं ना उदास गुरुराया ॥४॥
मातेनें लाथेनें ताडितां हो वत्स । जलें विण मत्स्य केवीं राहे ॥५॥
पडेल देऊळ पूजकाचे वरी । तरी कैसी परी होय जगीं ॥६॥
येईं रे येईं तूं अनाथांच्या नाथा । सद्गुरुसमर्था पाव आतां ॥७॥
तळमळे रंग करीं भवभंग । दाखवीं श्रीरंग पाय तुझे ॥८॥
***************************
जावें संतांसी शरण । भावें करावें मनन ॥१॥
तनु मन धनें सेवा । वरी दाखविती देवा ॥२॥
भवजल हें अफाट । कोण दावी येथें वाट ॥३॥
काम क्रोध मद मत्सर । नक्र सूसर जलचर ॥४॥
मोह अहंतेच्या लाटा । मन धांवे दाही वाटा ॥५॥
वारा कल्पनेचा थोर । जन्ममृत्यु डोह घोर ॥६॥
देहपोत छिद्रें फार । जरी सुकृत अपार ॥७॥
रंग संत कर्णधार । तेचि पावविती पार ॥८॥
***************************
दत्त दत्त ध्यान वेडावलें मन । तनु धन प्राण पायीं तुझे ॥१॥
मागणें तें लई आणि नाहीं माई । पददास्य देईं तोष तेणें ॥२॥
संकल्पाचें जाळें तोडियेलें बळें । निःसंकल्प केलें स्वामिरायें ॥३॥
त्रिलोकींचें राज्य तव पदरज । सर्वसुखकंज भृंग रंग ॥४॥
***************************
सुखाचें आगर मुक्तीचें माहेर । दयेचा सागर दत्त माझा ॥१॥
मीतूंपण माझें हरपुनी ओझें । एक रुप तुझें दावी देवा ॥२॥
संसारसागरीं बूडतों वेव्हारीं । धांव असुरारि पाव वेगीं ॥३॥
दुर्वृत्तिदानवें पीडियेलों भारी । धांव मदनारि धांव आतां ॥४॥
काष्ठासी पालवी आणियेली वेगीं । कुष्ठ लगबगीं निवारिलें ॥५॥
वंध्या दूभविली वेल खंडियेली । रत्नपेटी दिली विप्राकरीं ॥६॥
आतांचि आळस कां करी मानस । हंबरे पाडस ऐकसी ना ? ॥७॥
कोठें गुंतलासी अगा तपोराशि । उदास झालासी आजि कां गा ? ॥८॥
काय करुं आतां कोठें जाऊं दत्त । शरण समर्था तूंचि एक ॥९॥
तारीं किंवा मारीं बैसलोंसे द्वारीं । दृढ धरणें धरीं निश्चयाचें ॥१०॥
***************************
मनें निर्मीयेलें मनेंचि मोडिलें । आदिअंतीं भलें एक ब्रह्म ॥
नित्य शुद्ध बुद्ध परम पवित्र । निरं सूत्र पटीं शोभे ॥
मध्येंचि पसारा तेणें येरझारा । कल्पनाबाजारा स्वप्न मोठें ॥
स्वप्नीं राज्य केलें जाग्रतीं निमालें । तैशा परी झालें अज्ञजनीं ॥
अंधतमव्याप्त तमिस्त्रा समाप्त । होतां अर्क दीप्त दीसों लागे ॥
रंग चहूं कडे एकचि उजेड । अंधकारवेड दूर पळे ॥
***************************
जाग रे राजसा सच्चिद्घन हंसा । परम पुरुषा जाग वेगीं ॥१॥
कर्में बांधियेलें मोहें व्यापियेलें । तेणें तळमळे झोंपीं जीव ॥२॥
श्रुतिबंदिजन गाती मधुस्वन । तत्त्वमसि भान ऊठ वेगीं ॥३॥
झोंपेचें हें सोंग टाकुनी सवेग । ऊठ बा निःसंग पहांट झाली ॥४॥
अरुण उदेला अंधकार गेला । असुरांचा मेळा लोपला तो ॥५॥
द्विज उभे ठेले पाय वंदियेले । स्नानासी आणिलें प्रेमजल ॥६॥
चक्रवाकपिल्लीं जीवशिवमेळीं । एकरस झालीं ब्रह्मानंदीं ॥७॥
हंस ऊठियेला सोहंभाव ठेला । कोहं मावळला रंग तम ॥८॥
***************************
नाना ग्रंथ केले संतीं । परी एक अर्थ अंतीं ॥१॥
देव सत्य देह मिथ्या । जीव भोगी केल्या कृत्या ॥२॥
जेणें जैसें जैसें केलें । फळ तैसेंचि लाधलें ॥३॥
जीव परकार्यीं गेला । चिरंजीव तोचि झाला ॥४॥
रंग पीडी जो पराला । पापी तोचि ओळखिला ॥५॥
***************************
मागणें तें एक आहे । कृपादृष्टीं बाळ पाहे ॥१॥
नको वैभवसंपत्ति । सदा राहूं दे सन्मति ॥२॥
मुखीं नसावें अनृत । सदा सेवावे सत्संत ॥३॥
रंगा आन चाड नाहीं । सर्व तुझें रुप पाही ॥४॥
***************************
काय करुं कीर्ति धन । जेणें शिरजोर मन ॥१॥
विद्या वितंड भांडण । कोंडा कर्दम कांडण ॥२॥
नार पोर घरदार । सर्व नश्वर बाजार ॥३॥
रुपीं अरुप जाहलों । रङग अरंगी उरलों ॥४॥
***************************
संकल्पांचे वनीं कोंडावला जीव । तृष्णेचे कुंपणीं भांबावला ॥१॥
काम क्रोध लोभ मद तो मत्सर । वनचर हिंस्त्र भयंकर ॥२॥
आशा भूतावळीं वेष्टियेलें दाट । आंत ना बाहेर सूचे वाट ॥३॥
पंचाक्षरीं आला सद्गुरु सदैव । दिला सोहंमंत्र प्रेमभावें ॥४॥
अभ्यासें आटिलें द्वैत देहभान। लया गेलें पूर्ण मीतूंपण ॥५॥
जेथें जाय मन तेथें समाधान । अंतर्बाह्य एक नारायण ॥६॥
जाणें येणें सर्व खुंटलें मायिक । आत्माराम दिसे सर्व एक ॥७॥
संकल्पांचें रान निःशेष जाहलें । जन्मकर्म सर्व दग्ध केलें ॥८॥
सर्वांला मारुनी एकचि उरला । एकसर्वभाव मावळला ॥९॥
सातां पैल रङग अरुप देखिला । अस्तोदयभाव लया गेला ॥१०॥
***************************
अरण्य पट्टण दोन्हीं सम आम्हां । निरिच्छ नितांत पूर्णकामां ॥१॥
झोंपडी महाल सम पाही मन । मंचक अजिन भेद कोण ॥२॥
शाल चिंध्याकंथा तनु दिगंबर । कस्तूरी उटणें भस्मसार ॥३॥
इंद्रियकटक सेवेसी सादर । भूतमात्र येर बद्धकर ॥४॥
वृक्ष फळफूल निर्झर जीवन । देऊनी पोषिती पंच प्राण ॥५॥
पक्वान्नाची चाड कोण करी मना । तिळभरी मागों नेणों जनां ॥६॥
दिवारात्री सूर्यचंद्र पहारेगीर । करी केरझाड सुसमीर ॥७॥
इंद्र मागे आज्ञा वंदुनी चरण । कुबेर भंडारी सिद्ध जाण ॥८॥
व्याल व्याघ्र येती वस्तीसी राहती । सुस्वरें ते गाती पक्षीजाती ॥९॥
मयूर नाचती केका ऐकवितो । गंधर्वाप्सरसां लाजविती ॥१०॥
आप्तपर भाव पूर्ण मावळला । एषणांचा नग भस्म झाला ॥११॥
येती जाती सारे मायिक नश्वर । रङग तोचि एक श्रेयस्कर ॥१२॥
***************************
शरण आलों तुझ्या पायां । भटकोनी जगीं वायां ॥१॥
आतां धाडीं न परता । पाहूं नको रे पात्रता ॥२॥
पात्र पाहुनी ठेविसी । तुझी थोरवी ते कैसी ॥३॥
आम्हीं नालायक चोर । नांव ऐकुनी आलों थोर ॥४॥
नांवा सारिखें दे दान । पद दावीं रे निर्वाण ॥५॥
भक्ति पाहुनी पावसी । वाण्या पैल रे भाससी ॥६॥
त्यांत थोरपणा कैसा । बाजारींचा भाव ऐसा ॥७॥
नांव पतितपावन । श्रुति स्मृति गाती जाण ॥८॥
पतित तो देई काय । मागे बाळा काय माय ॥९॥
मायबाप आलों द्वारीं । कृपाभीक रंगा घालीं ॥१०॥
***************************
निंदकांचे तोंडा कोण देई तोंड । निंदास्तुति गोड दोन्हीं आम्हां ॥१॥
प्रणवविस्तार पन्नास अक्षर । वाईट चांगुल तेथें कैंचें ॥२॥
डी ओ जी तो डाँग जी ओ डी तो गाँड । वाचणार द्वाड उलटें वाची ॥३॥
बुद्धिभेदें बोल भिन्न भिन्न फोल । वस्तु समतोल एक जगीं ॥४॥
देवा तुला लाज अन्याशीं न काज । निंदेची ती खाज जिरवीं वेगीं ॥५॥
कोणी कांही म्हणो लाथाडो वा हाणो । तुज विण नेणों आणि कांहीं ॥६॥
होऊं सावधान विचारुनी मन । सहूं मानामान आनंदानें ॥७॥
संकल्प निःसार शब्दांचा बाजार । रंग एक सार दुजा नसे ॥८॥
***************************
आडीं जैसें असे पोहर्यांत येतसे । अंतर्बाह्य वसे साक्ष एक ॥१॥
कूपीं कटु नीर दुरुक्त बाहेर । गढूळ निर्मळ तैसें तैसें ॥२॥
वरपांगी वेष टिके ना कसास । होत उपहास जगीं सर्व ॥३॥
अंतरीं जे शांति संतांची विभूति । वरकड माती आडंबर ॥४॥
असे तें येतसे देतां धन जैसें । निर्धन तें कैसें काय द्यावें ॥५॥
धर्मीं धर्मदान दाखविती वर्म । अधर्मी अधर्म वाढविती ॥६॥
रोगी वाढविती रोगाचें प्रमाण । पापी पाप जाण तैसें जगीं ॥७॥
दुर्बल दौर्बल्य निश्चयी निश्चय । हरिरंगी सत्य रंग तैसा ॥८॥
***************************
द्वैताद्वैत सर्व खोटें । पैल रुप तें गोमटें ॥१॥
नाहीं रुपरंग जेथें । गुण आकृति वोखटें ॥२॥
सर्वां विसरुनी जावें । तेव्हां आपें तेंचि व्हावें ॥३॥
व्हावें परी जें नेणावें । नेणुनीचि तें जाणावें ॥४॥
जेथें जाणणें नेणणें । व्यर्थ श्रम हें बोलणें ॥५॥
मन वाणी पैल रंग । दृश्यादृश्य सर्व सोंग ॥६॥
अवघा मायेचा बाजार । क्षराक्षरातीत पर ॥७॥
सर्वाधार सर्वा विण । रंग व्यर्थ वाणी शीण ॥८॥
***************************
देव पाहूं इच्छी मन । घरीं संतांचे चरण ॥१॥
दूर ठेवीं अभिमान । पायीं अर्पी तनमन ॥२॥
सेवें देह झिजवावा । कृपाप्रसाद पावावा ॥३॥
अहो संत हे उदार । देण्या नांही लहान थोर ॥४॥
कुळ गोत न पाहती । आत्मस्वरुप करिती ॥५॥
जरी असे पुण्य गांठीं । रंग ऐशां पडे गांठीं ॥६॥
***************************
आदिअंतीं एक ब्रह्म । मध्यें कोठोनी हा भ्रम ॥१॥
कैंक काळाचा चूकला । जीव शोधी निज मूळा ॥२॥
उफराटी होतां दृष्टि । ब्रह्मीं भासे नसती सृष्टि ॥३॥
डोळ्या कावीळ जाहलें । अवघें पीतचि भासलें ॥४॥
ज्ञानांजनें दृष्टि आली । भ्रांति समूळ नासली ॥५॥
दोर अंधारीं न दिसे । तोंवरीच सर्प भासे ॥६॥
आप्तें दीप दीप्त केला । सर्पभाव लया गेला ॥७॥
आदिअंतीं एक दोर । मध्यें भुजंगम घोर ॥८॥
झाला नसोनी भासला । अज्ञ देखोनी त्रासला ॥९॥
तैसें ब्रह्मीं दिसे जग । झालें नसोनी वाउग ॥१०॥
जीव देखोनी घाबरे । वांया जन्ममृत्यु फिरे ॥११॥
देहीं देव ओळखिला । रंग अभय जाहला ॥१२॥
***************************
स्थळ रितें संतां विण । तेंचि जाणावें स्मशान ॥१॥
तेथें राहूं नये कधीं । मूळ विचारीं रे आधीं ॥२॥
जेथें दत्त दत्त घोष । तेथें मना वाटे तोष ॥३॥
शास्त्रश्रवण सत्कथा । तेणें जावें मोक्षपंथा ॥४॥
नसे वाटाडया सद्गुरु । पावे कैंचा पैल पारु ॥५॥
रंग संतपदीं लीन । मागे दास्यत्वाचें दान ॥६॥
***************************
आम्हीं दत्ताचे नोकर । त्याची खातसों भाकर ॥१॥
कोण काय आम्हां देई । कपाळीचें काय नेई ॥२॥
तुम्हीं ऐका हो श्रीमंत । नका होऊं मदोन्मत्त ॥३॥
धन जाईल जाईल । काळ जीवित खाईल ॥४॥
वाचे वदा दत्त दत्त । भावें सेवा साधुसंत ॥५॥
रंग प्राण येतां कंठी । तेचि तारितील क्षितीं ॥६॥
************************
न मिळो तें अन्न वस्त्र प्रावरण । परी दत्त जाण अंतरी ना ॥१॥
कवडीमोल धन होवो निःसंतान । न राहो निशान कोण रडे ॥२॥
हेंचि मागों देवा दे गा संतसेवा । अंतरीं केशवा ठाणें देईं ॥३॥
न पडो विसर अवधूत धूसर । सबाह्यअंतर तूंचि देवा ॥४॥
जग हें निःसार तूंचि एक सार । वृत्ति त्वदाकार होवो माझी ॥५॥
सदा मुखीं नाम आन नसो काम । मोह दाम चाम निरसीं वेगीं ॥६॥
रंग तोक तुझें भव रोगें कूजे । कोण वैद्य दूजें तुज विण ॥७॥
************************
देह तें देऊळ आत्मा देव मूळ । प्रेम कंजफूल तोषवाया ॥१॥
साधन विवेक वैराग्य निःशंक । अन्य जें अशेख पोटपूजा ॥२॥
अहंब्रह्मध्यान महावाक्यमनन । अन्योन्य कथन अभ्यास हा ॥३॥
रंग देहभान होतां निरसन । सच्चित्सुखधन प्रकाशला ॥४॥
************************
करुणासागर देव विश्वंभर । दत्त दिगंबर ध्याईं मना ॥१॥
तीन शिरें हात सहा संत गात । वेदश्वान भाट मूक झाले ॥२॥
वर्णीतां वैखरी न चले हो हरी । केव्हां नृकेसरी पाहीन बा ॥३॥
संतांचे माहेरा कां करी अव्हेरा । रंग येर झारा कोण टाळी ? ॥४॥
************************
अनाथांच्या नाथा लाज तुझे हाता । पुनः पुनः माथा चरणीं ठेवी ॥१॥
न जाणे मी आन त्वद्यशर्णन । शास्त्र व्याकरण नेणों कधीं ॥२॥
न केलें श्रवण कोठोनी मनन । न तपश्चरण काय दावूं ॥३॥
नीरस हे बोल बोबडे बेताल । वाजवितों गाल तुज पुढें ॥४॥
तूंचि बापमाई गोड करुनी घेईं । पैलपार नेईं बूडों नेदी ॥५॥
न मागे मी आन वैभवसाधन । एक वेळ म्हणे रंग माझा ॥६॥
************************
तुम्हीं ऐका सर्व संत । द्वारीं आलों भवजंत ॥१॥
नेणों मागों कैसी भीक । द्यावी आपोआप शीख ॥२॥
नका पाहूं गुणदोष । अपराधांचा भरला कोश ॥३॥
तुम्हीं उदार कल्पतरु । नका पाहूं अधिकारु ॥४॥
काळा काजळ कोळसा । अग्निसंगें झाला कसा ॥५॥
तैसा दुःशील मी खळ । रंग करा हो निर्मळ ॥६॥
************************
सर्वव्यापी नारायण । कैसें करुं आवाहन ॥१॥
अन्तर्बाह्य सच्चिद्घन । कैसें करुं हो मी ध्यान ॥२॥
कोठें नसे तो आपण । काय अर्पूं हो आसन ॥३॥
नाहीं जेथें लेश मळ । कैसें अर्पूं स्नाना जळ ॥४॥
सूर्यचंद्र तेजें तपे । तेथें दीप कैसा खपे ॥५॥
सर्वभक्षी काळ त्याला । अर्पूं नैवेद्य कोठला ॥६॥
शुद्ध अंतःकरण जाण । परी केलें सिंहासन ॥७॥
तेथें बैसविला देव । प्रेमजळीं न्हाणीं शिव ॥८॥
प्राणपुष्पें हो पूजिला । द्वैत नैवेद्य अर्पिला ॥९॥
सत्य चंदन लाविला । कामक्रोध धूप भला ॥१०॥
सोहंभाव दीप केला । मोहतम लयीं नेला ॥११॥
भक्तितांबूल दीधला । ऐक्यभावें आलिंगिला ॥१२॥
व्यवहारीं येरझारा । प्रदक्षिणा प्राणाधारा ॥१३॥
शब्द येती जे बाहेर । तेचि प्रार्थना विमळ ॥१४॥
ऐसें केलें हो पूजन । हारपलें देहभान ॥१५॥
मन होऊनी उन्मन । रंग नाचे नारायण ॥१६॥
कधींचा मी ऊभा द्वारीं तव देवा । धांव ये केशवा थांबूं नको ॥१॥
तिळतिळ तूटे जीव हा माधवा । पाहीन केधवां रुप तुझें ॥२॥
काषाय वासस माथा जटाभार । हातीं दंड माळ शोभतसे ॥३॥
जन्मींचा भिकारी फिरें दारोदारीं । लोटीं ना माघारी दीननाथ ॥४॥
बहुतां जन्मां अंतीं पावलें हें द्वार । न करीं धिक्कार दयासिंधो ॥५॥
उच्छिष्टाचा भूका रंग रंक तोका । न मागे भवसुखा दास्य देईं ॥६॥
************************
केव्हां घेशी दाद ऐकशी फिर्याद । अर्भकाचा नाद पुरवी वेगें ॥१॥
बाल मागे चंद्र माता हसे सांद्र । सर्व सुख केन्द्र स्तन्य देई ॥२॥
भूलवोनी छंद करी सुखकंद । उमजल्या मंद आप होई ॥३॥
तैशी नारायणा करावी करुणा । तारा हीना दीना पांडुरंगा ॥४॥
************************
सर्व सुखाचें आगर । देव दत्त दिगंबर ॥१॥
सहा हात षड् विभूति । तीन शिरें सत्सुखज्योति ॥२॥
शील धेनु धर्म परी । श्वाननिगम जवळीं ॥३॥
योगभूमि तें श्मशान । बाह्य वायु गंगास्नान ॥४॥
कांखे झोळी माधुकरी । नित्य नवी भिक्षा बरी ॥५॥
वस्त्र नाहीं दिगंबर । परी बाप विश्वंभर ॥६॥
जगीं नटला नारायण । त्यासी कैसें आच्छादन ॥७॥
भक्तसंगें रंग धरी । देह विदेही नृहरि ॥८॥
************************
ऐका ऐका सर्व जन । भावें भजा नारायण ॥१॥
जगीं तारक दुसरा । नाहीं नाहीं हो आसरा ॥२॥
स्नान संध्या टिळे टाळ । भक्ति विण व्यर्थ माळ ॥३॥
स्नेहें विण दीप जसा । भक्ति विण थाट तसा ॥४॥
बहुतां जन्मींचें सृक्रुत । हाता लागे नरपोत ॥५॥
तरा यावन्न विभिन्न । अंतीं पश्चात्तापें खिन्न ॥६॥
देह स्वस्थ रंग बरा । नाहीं आली जै हो जरा ॥७॥
आत्मसार्थक तैं करा । मुक्तिसुख शांति वरा ॥८॥
************************
चला चला हो माहुरीं । भक्तजनांचे माहेरीं ॥१॥
मात रेणुकेचें स्थान । तेथें वसे दत्त जाण ॥२॥
करी भक्तांचा सांभाळ । द्वैत येऊं नेदी काळ ॥३॥
रंग म्हणे काळ गेला । हाता फिरोनी न आला ॥४॥
************************
चला चला रेवातटीं । अनसूया ती गोमटी ॥१॥
असे आश्रम पावन । होत नेत्र-संतर्पण ॥२॥
जरा मृत्यु दूर जाती । मोक्ष लागे बळें पाठीं ॥३॥
रंग माया भ्रम नासे । पूर्ण ब्रह्म दत्त दिसे ॥४॥
************************
ऐसें कैसें केलें देवा । घडली नाहीं कांहीं सेवा ॥१॥
नाहीं देहाची ह्या चाड । जावो अथवा राहो द्वाड ॥२॥
परी पडो न विसर । हेंचि मागों दिगंबर ॥३॥
चरण विसंबो ना क्षण । रंग राहो निर्मळ मन ॥४॥
************************
पडतां पापीं धारी धर्म । दावी सत्यासत्य वर्म ॥१॥
सत्य तप घृति सार । शौच हेचि पाद चार ॥२॥
नेत्र प्रवृत्ति निवृत्ति । स्वर्ग मोक्ष फळ देती ॥३॥
दया दान हात होती । जीव अहिंसा निश्चितीं ॥४॥
रंग निश्चयें राहती । पुनरावृत्ति न पाहती ॥५॥
************************
प्राणें विण देह जैसा । धर्में विण नर तैसा ॥१॥
चंद्रा विण कीं ते राती । दीप जैसा विण वाती ॥२॥
खानपान भय मैथुन । निद्रा पशूंत समान ॥३॥
कोण विशेष नृदेहीं । जरी सारासार नाहीं ॥४॥
धर्म हेंचि धन नरा । प्राणा पैल रक्षा करा ॥५॥
अंतीं तोचि हो सांगाती । रंग दारादि न राहती ॥६॥
************************
सर्व निगामाचें सार । ब्रह्म सत्य जग निःसार ॥१॥
मनोभावें गुण गावें । रुप देवाचें तें ध्यावें ॥२॥
परकार्यीं देह जावा । लाभ अनंत हा घ्यावा ॥३॥
जगीं मरुन उरावें । कीर्तिरुपें अमर व्हावें ॥४॥
ब्रह्मीं एकरस व्हावें । रंग अरंग तें पहावें ॥५॥
***********************
पोटा पुरती भाकरी । देगा न देगा बा हरी ॥१॥
लाज झांकाया लंगोटी । मिळो न मिळो जीर्ण ती ॥२॥
देह रोगें होवो क्षीण । परी मन पायीं लीन ॥३॥
जनीं वनीं वा स्मशानीं । देह पडो त्वत्स्मरणीं ॥४॥
दत्त दत्त ऐसें ध्यान । मन व्हावें हें उन्मन ॥५॥
सर्वां भूतीं रंग रुप । एक अभंग अनुप ॥६॥
************************
सर्व साधनांचें सार । आत्म अनात्म विचार ॥१॥
देव कोण देह कोण । मन प्राण इंद्रिय कोण ॥२॥
सर्वां भूतीं देव एक । निरंजन सच्चित्सुख ॥३॥
तेथें अहंस्फुरण माया । ज्ञान अज्ञानाची काया ॥४॥
ज्ञानें परिच्छिन्न शिव । छिन्न अज्ञानें तो जीव ॥५॥
व्यष्टिसमष्टीचा झाडा । पिंड ब्रह्मांड निवाडा ॥६॥
स्वप्नीं लगीनसोहळा । वंध्यापुत्र जन्मा आला ॥७॥
तेणें नाथिले सुरवर । कैंची मिटे येरझार ॥८॥
ज्ञान अज्ञान सांकडें । पैल ब्रह्म तें रोकडें ॥९॥
रंग रुप नाहीं जेथें । कुळ गुण केवीं तेथें ॥१०॥
चारि साही झाल्या कष्टी । अठरा वर्णितां हिंपुटी ॥११॥
सोऽहं शब्दें हंस भेटी । रंग अरंगी ते ज्योति ॥१२॥
************************
मोक्षाचें तें मूळ सत्संग विमळ । साधन सकळ सिद्ध होती ॥१॥
श्रवण मनन नित्य क्षण क्षण । दृढ ब्रह्मज्ञान होत जेणें ॥२॥
सदय ते संत उदार महंत । सारासार अंत जिहीं केला ॥३॥
दगड ब्राह्मणें बैसविला कोंडें । पूजिती रोकडे लोक सर्व ॥४॥
देहीं देव ठेला न कळे अज्ञाला । अनुग्रह केला रंग संतें ॥५॥
************************
संत ओळखावे शीतळ स्वभावें । तनु मन भावें सेवा कीजे ॥१॥
मृदु नवनीत कठिण पर्वत । प्रसंग उदित होई जैसा ॥२॥
मुखीं रामनाम अन्य नसे काम । पाहतां विश्राम वाटे जीवा ॥३॥
पर उपकारें झिजविती देह । ब्रह्मांडीं निःस्नेह वर्तताती ॥४॥
आप पर नाहीं निःसंग सदाही । रागद्वेष कांहीं नसे जेथें ॥५॥
दया तोचि धर्म दान तेंचि कर्म । तितिक्षेचें वर्म मूर्तिमंत ॥६॥
पतित उद्धार हाचि कुलाचार । रंग मिथ्याचार लेश नसे ॥७॥
************************
पतिताचा तात तूंचि भगवंत । उद्धरिसी जंत केव्हां बापा ॥१॥
पीडियेलों भारी दत्ता ह्या संसारीं । धांव बा मुरारी धांव आतां ॥२॥
तस्करें वधितां धांवलासी ताता । विलंब कां आतां करितोसी ॥३॥
प्रह्लादाचे हांकें स्तंभ तो कडाके । दितिसुत धाकें पाडियेला ॥४॥
गजेंद्र धरिला वेगें सोडविला । वेळ कां लाविला दीननाथा ॥५॥
द्रौपदीकारणें ओढितां खलानें । वस्त्ररुप होणें लोपलें कां ॥६॥
फूटलें नशीब रुठला तो शिव । धिक् धिक् कींव येई ना कीं ॥७॥
कोणा बाहूं आतां कोंण असे त्राता । कोण देई शांती परदेश्या ॥८॥
पातलोंसे द्वारीं जन्माचा मिकारी । कृपेची भाकरी देई देवा ॥९॥
ब्रीदातें सांभाळीं अगा वनमाळी । रंग प्रतिपाळीं पोरका हा ॥१०॥
************************
भावाचा भूकेला देव माझा भला । खाई भाजीपाला विदुराचा ॥१॥
दुर्योधनमेवा न रुचे केशवा । उंचनीच हेवा नसे मनीं ॥२॥
प्रेमें विण भक्ति स्नेहें विण दीप्ति । व्यर्थ होतां कष्टी काय फळ ॥३॥
स्वप्नाचे पक्वान्नें तृप्तीचें बोलणें । कंठा विण गाणें व्यर्थ जगीं ॥४॥
रंग लागी छंद भजनें मुकुंद । सच्तिसुखकंद दूर नसे ॥५॥
************************
सगुण निर्गुण दोन्हीं समरस झालें । पहातां निवाले नयन माझे ॥१॥
सच्चिदानदें मुखर्त्रितय धरिलें । गुणैश्वर्य झालें भुजषट्क ॥२॥
वेद मूक झाले नेति नेति गाती । श्वानरुपें वाहती पुढें मागें ॥३॥
शास्त्रें पक्षिरुपें कल्लोळ करिती । स्मशान वसति केली देवें ॥४॥
योगभूमि हेचि संत वाखाणिती । श्वान सुरभि पाहाती एक दृष्टि ॥५॥
ब्रह्मानंदे टाळी पिटीतां हो रंगे । भव भय भंगे काळ कांपे ॥६॥
***********************
अर्पिली लेखणी दत्ताचे चरणीं । लिहुनी लिहुनी कैंक गेले ॥१॥
ग्रंथांचा डोंगर भ्रांतीचा सागर । चढुनी पडुनी कैंक मेले ॥२॥
लेखन पठन व्यर्थ माया शीण । जरी मन क्षीण नाहीं झालें ॥३॥
वटवृक्षातळीं सद्गुरु-माऊली । मौनसुद्रें भली हेंचि सांगे ॥४॥
जीव शिव एक विचार अशेष । त्रिगुणविवेक जग सर्व ॥५॥
बहुती लिहिलें तेंचि तें कथिंलें । अन्य न देखिलें सर्व जगीं ॥६॥
मायातीत हरि वर्णूं कैशापरी । सुमन वैखरी रंग आटे ॥७॥